ठाणे प्रतिनिधी – नागेश पवार
ठाणे 18 : मध्य रेल्वेच्या ठाणे–मुलुंड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या रेल्वे स्थानकाला ‘आनंद दिघे’ यांचे नाव देण्याबाबतचा अभिनंदनाचा ठराव बुधवारी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
ठाणे–मुलुंड दरम्यान वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन स्थानक उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या स्थानकासाठी येणाऱा संपूर्ण खर्च रेल्वे करणार असून या नव्या स्थानकामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होऊन प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवीन ठाणे स्थानकासाठी 250 कोटींच्या वर खर्च येणार होता. स्मार्टसिटी बरोबर जो करार झाला होता त्यामध्ये सदरचा खर्च ठाणे महानगरपालिका आणि काम रेल्वे करणार असे ठरले होते, परंतु या कामाच्या मंजुरीला विलंब लागल्याने हा खर्च वाढला होता, यासाठी रेल्वे सातत्याने खर्चाची मागणी करत होते. यावर खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्र्यांना भेटून सदरचा खर्च रेल्वेने करावा याबाबत पाठपुरावा केला.
कोविडनंतर ठाणे महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने हा खर्च रेल्वेने करावा अशी सातत्याची मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली, याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात अनेक बैठका दिल्लीमध्ये घेतल्या तसेच खासदार श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांनी देखील वारंवार संसदेत ही मागणी केली, यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा खर्च रेल्वे करेल असे मान्य केले, याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलवून देखील ही बाब सांगितली व तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी सादर केला असल्याचे सांगितले.
याबाबत खासदार श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून ठाणे महानगरपालिकेवरील आर्थिक बोजा कमी केला, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के यांच्या अभिनंदनाचा ठराव बुधवारी झालेल्या महासभेत मांडण्यात आला व तो एकमताने मंजूर करण्यात आला.
या नवीन रेल्वे स्थानकाला धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव द्यावे अशी मागणी नरेश म्हस्के यांनी संसदेच्या सभागृहात केली, याबाबत ठराव महासभेत मांडण्यात आला आणि तो मंजूर करण्यात आला.
आनंद दिघे यांनी ठाणे शहराच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक क्षेत्रात केलेले योगदान लक्षात घेता, त्यांच्या नावाने स्थानकाचे नामकरण करणे ही ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या निर्णयामुळे ठाणे–मुलुंड परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, नवीन स्थानकामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
