दै. चालु वार्ता, पैठण प्रतिनिधी तुषार नाटकर–
छ. संभाजीनगर (पैठण) : पैठण तालुक्यातील दादेगाव नवीन येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सिद्धार्थ प्रवीण अंधारे याची जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या उल्लेखनीय यशानिमित्त शाळेत सिद्धार्थचा जंगी सत्कार करण्यात आला.
सिद्धार्थ अंधारे याने नवोदय प्रवेश परीक्षेत यश संपादन करत शाळेचे तसेच गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षकवर्ग व ग्रामस्थांनी त्याचे कौतुक करत अभिनंदनाचा वर्षाव केला.
या प्रसंगी सिद्धार्थसोबत त्याचे वडील प्रवीण अंधारे यांचाही सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी सिद्धार्थच्या मेहनतीचे कौतुक करत त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे केंद्रप्रमुख उत्तम खरात, केंद्रीय मुख्याध्यापक दिलीप थोटे, मुख्याध्यापक राजेंद्र दहिफळे, वर्गशिक्षिका वैशाली चव्हाण, शिक्षक सुनिल बडे, गंगाधर काळे, गुलाब बागवान, प्रकाश आव्हाड, सागर ढवळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि विद्यार्थ्याच्या जिद्दीमुळे हे यश शक्य झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आकाश ताकवाले व महादेव भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सिद्धार्थचा सत्कार करण्यात येऊन त्याला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्यात आली. सिद्धार्थ अंधारे याच्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून इतर विद्यार्थ्यांसाठीही तो प्रेरणादायी ठरत आहे. मेहनत, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर कोणतेही यश प्राप्त करता येते, याचे उत्तम उदाहरण सिद्धार्थने घालून दिले आहे.
चौकट
-सिद्धार्थ अंधारेची नवोदय विद्यालयासाठी निवड
शाळेत जंगी सत्कार
-वडिलांचाही सन्मान
शिक्षकांच्या मार्गदर्शनातून घवघवीत यश
-विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कामगिरी
