इराण-अमेरिका युद्धविरामावरून इस्रायलने भारताच्या भूमीतून पाकिस्तानला फटकारले…
इराण आणि अमेरिका व इस्रायल यांच्यात गेले काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. अखेर पाकिस्तानच्या पुढाकाराने बुधवारी शस्त्रसंधीच्या मुद्द्यावर तिन्ही देशांमध्ये मतैक्य झाले.
मात्र इस्रायलचे भारतातील राजदूत रेउवेन अझर यांनी अमेरिका-इराण शस्त्रसंधीच्या चर्चेत पाकिस्तानच्या मध्यस्थीवर शंका उपस्थित केली आहे. या चर्चेमध्ये इस्रायल पाकिस्तानला ‘विश्वासार्ह घटक’ मानत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“आम्ही पाकिस्तानला एक विश्वासार्ह प्लेअर म्हणून पाहात नाहीत,” असे अझर एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले. तसेच त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानबरोबर संबंध ठेवण्याची अमेरिकेची वेगळी कारणे असू शकतात. ते म्हणाले की, “अमेरिकेने स्वतःच्या कारणांसाठी पाकिस्तानच्या मदतीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.”
यावेळी अझर यांनी उदाहरण देखील दिले, त्यानी सांगितले की, हमासह इतर देशांशी करार करण्यासाठी यापूर्वी अमेरिकेने कतार आणि तुर्किये यासारख्या अडचणीच्या देशांबरोबर मिळून काम केले आहे. “आम्हाला अपेक्षित असलेल्या परिणामाचे मुख्य भाग आणि सार अमेरिकेशी सुसंगत असणे हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे,असे इस्रायलचे राजदूत म्हणाले.
अमेरिकेचे शिष्टमंडळ पाकिस्तानला जाणार
अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर करण्यात आल्यानंतर अझर यांचे हे विधान समोर आले आहे. दरम्यान या आठवड्याच्या अखेरीस इराणबरोबर एका दीर्घकालीन करारावर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे उप-राष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळासह पाकिस्तानला भेट देणार आहे.
युद्धविरामाबद्दल बोलताना अझर म्हणाले की, इस्रायलला आशा आहे की वाटाघाटीमुळे युद्धविरामावर भाष्य करताना अझर म्हणाले की, इस्रायलला अशी आशा आहे की या वाटाघाटींमुळे इराणचा अणू कार्यक्रम आणि इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उत्पादन हे दोन इस्रायलच्या ‘अस्तित्वाला असणारे धोके’ हटवले जातील.
अझर यांनी पुढे बोलताना सांगितले की, इस्रायलचे ध्येय हे तेथील राजवटीला कमकुवत करून इराणी लोकांना त्यांचे भविष्य स्वत:च्या हातात घेण्याची संधी देणे हे होते. तसेच आपण हे ध्येय पूर्ण केल्याचा दावाही अझर यांनी यावेळी केला.
लष्करी कारवाई कमी केल्यानंतर आता इस्रायल आपले लक्ष्य दुसरीकडे वळवत असल्याचे अझर यांनी नमूद केले. आता आमची लष्करी कारवाई संपल्याने, आम्ही आता डिप्लोमसीकडे वळत आहोत, असे ते म्हणाले. तसेच जर गरज पडली तर बळाचा वापर करण्याचा पर्याय देखील खुला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. “आम्हाला आशा आहे की आम्हाला पुन्हा लष्करी कारवाईकडे वळावे लागणार नाही, परंतु इराणच्या राजवटीने आमच्यासमोर दुसरा पर्याय ठेवला नाही, तर आम्ही ते नक्कीच करू, असेही त्यांनी स्पष्ट केले
