करूणा मुंडे काय-काय बोलल्या?
धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची चूक करू नये. ज्या पक्षाने त्यांना मंत्री केले तर त्यांची सत्ता जाईल. हे माझे शब्द आहेत. धनंजय मुंडेंनी फक्त पदाचा गैरवापर केलाय. माझ्यावर आणि गोरगरिब लोकांवर सुद्धा धनंजय मुंडेंनी केस दाखल करत तुरूंगात टाकले, असा आरोप पत्नी करूणा मुंडे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंडे समर्थकांनी धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्री करावे, अशी मागणी केली होती. त्याबद्दल प्रश्न विचारल्यावर करूणा मुंडेंनी एकच हल्लाबोल केला आहे. त्या एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होत्या.
करूणा मुंडे म्हणाल्या, “धनंजय मुंडेंना मंत्री करण्याची चूक कुठल्याही पक्षानं करू नये. असे केल्यास त्या पक्षाची सत्ता जाईल. पुन्हा कधीही ते सत्तेत येणार नाही. त्यांची मंत्रिमंडळात काहीच गरज नाही. मंत्रिमंडळात मुंडेंनी फक्त आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. स्वत:च्या बायकोला तुरूंगात टाकलं आहे. माझ्यासारख्या १ हजारहून अधिक गोरगरिब लोकांवर खोट्या केस दाखल करत कोठडीत पाठवलंय. सगळ्यात जास्त सत्तेचा आणि पदाचा गैरवापर धनंजय मुंडेंनी केला आहे.
बलात्कार, खून, लोकांच्या जमीन हिसकवण्यासाठी मुंडेंना मंत्रिपद पाहिजे का? पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंला वंजारी समाजानं नाकारलं आहे. सगळ्यांच्या डोक्याला बंदूक लावून आणि दमदाटी करून धनंजय मुंडे निवडून आले आहेत. आता पूर्ण टीम तुरूंगात गेली आहे, असे टीकास्त्र करूणा मुंडेंनी डागलं आहे.
“मी बारामतीची पोटनिवडणूक अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवत आहे. कारण, अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. सुनेत्रा पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांनी एफआयआर दाखल केला नाही. या महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय मिळाला नाही, मग सर्वसामान्यांचे काय?” असा सवाल करूणा मुंडेंनी उपस्थित केला आहे. काँग्रेसने या निवडणुकीत आपला डमी उमेदवार उभा केला. नंतर माघार घेतली. मलाही खूप काही ऑफर आल्या. खासदार पार्थ पवार यांचाही फोन आला. पण मी माघार घेतली नाही, असेही करूणा मुंडेंनी सांगितलं.
