महिला अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय साहित्य संमेलन आज (11 एप्रिल) दिल्लीत पार पडत आहे. या संमेलनानिमित्त प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी झाल्याबाबत भाष्य केले आहे.
याप्रकरणी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह अनेक जण शरद पवारांवर टीका करताना दिसत आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांचे समर्थन करताना टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे, तर वारकरी हा महाराष्ट्र धर्माचा राखणदार आहे. समतेची, मानवतेची शिकवण देणारा, महाराष्ट्र धर्म जागवणारा वारकरी संप्रदाय नेहमीच मनुवाद्यांसाठी अडचणीचा ठरला म्हणूनच संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांपासून तर जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत सगळ्यांनाच छळण्याचं काम या मनुवाद्यांनी केलं. ज्ञानोबा माऊली आणि तुकोबारायांपेक्षा मनुला श्रेष्ठ म्हणणाऱ्या, वारकऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवतला केवळ भाष्ये म्हणणाऱ्या या मनुवादी प्रवृत्ती आजही कार्यरत आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. हीच वस्तुस्थिती शरद पवार यांनी मांडली आहे. शरद पवारांची प्रतिक्रिया मनुवाद्यांना झोंबणारंच म्हणून तर आज मनुवादी बिळातून बाहेर येऊन प्रतिक्रिया द्यायला लागले आहेत. पण या मनुवादी प्रवृत्तींचा रोहित पवार यांनी जाहीर निषेध केला आहे.
शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?
अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेत शरद पवार म्हणाले की, वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही हे प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 60 टक्के लोक हे बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल, अशा पद्धतीने मांडणी करतात. त्यामुळे आम्ही आता अशा लोकांची यादी करायला सुरुवात केली आहे. साधारण चाळीसएक लोक असे दिसतात की, ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडत असतात. त्यांची अत्यंत गरज आहे. पण दुर्दैवाने या प्रबोधनाच्या मार्गावर कुठे महिला दिसत नाहीत, अशी खंत शरद पवार यांनी स्मरणिकेतून व्यक्त केली आहे.
