खरात प्रकरणी पहिल्यांदाच शरद पवारांच्या बड्या नेत्याचे नाव; म्हणाल्या मला अपेक्षा नव्हती…
बहुचर्चित अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मोठे दावे केले आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अशोक खरातच्या संपर्कात अनेक बडे राजकीय नेते आणि अधिकारी असल्याचा गौप्यस्फोट केला.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत काही नेत्यांची नावे जाहीर केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत या प्रकरणात नाव न आलेल्या शरद पवार गटातील एका बड्या नेत्यांनेही अशोक खरातशी संपर्क केल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे.
रुपाली चाकणकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उल्लेख करत त्यांनी गंभीर आरोप केले. चाकणकर या अशोक खरातशी सर्वाधिक संपर्कात असलेल्या व्यक्तींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून एक फोन कॉल तब्बल 22 मिनिटांचा असल्याचा दावा दमानिया यांनी केला.
याशिवाय, नितीन पवार, चंद्रकांत पाटील, उदय सांगळे, शिवाजी शहाणे, पोपटराव पवार, सुनील तटकरे, दीपक केसरकर यांसारख्या नेत्यांची नावेही त्यांनी घेतली. काहींनी अनेक वेळा फोन कॉल केल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना दमानिया यांनी आश्चर्य व्यक्त केले. “जयंत पाटीलही अशोक खरातकडे गेले होते, त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती,” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अशोक खरातला मोठे करणारे राजकारणी आणि अधिकारी होते. काहींनी स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक कारणांसाठी त्याच्याशी संपर्क साधला असावा,” असा आरोपही अंजली दमानिया यांनी केला.
या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून संबंधित नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता महिना उलटूनही रुपाली चाकणकर यांना चौकशीला बोलवण्यात आलेले नाही. मी एसआयटीकडे त्यांना चौकशीसाठी बोलवण्याची मागणी करणार असल्याचे अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
