आता बस्स झालं…
मध्य पूर्वेतील संघर्षामुळे बहुतांश देशांमध्ये तेलाचे संकट अधिक गडद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने इराण आणि रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी निर्बंधांमध्ये सूट दिली होती, जी आता संपत आहे.
अमेरिकेने ही सूट वाढवण्यास नकार दिला आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेझंट यांनी याविषयी बोलताना, वॉशिंग्टन रशिया आणि इराणकडून ऊर्जा खरेदी करण्याची परवानगी देणारी निर्बंधांमधील सूट वाढवणार नाही असे म्हटले आहे.
अमेरिकेचे अर्थमंत्री काय म्हणाले?
बेझंट यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले, आम्ही रशियन आणि इराणी तेलासाठीचा सर्वसाधारण परवाना नूतनीकरण करणार नाही. ११ मार्चपूर्वी, जहाजांवर भरलेले किंवा वाहतुकीत असलेले तेल विकण्याची परवानगी होती. बेझंट म्हणाले की, ते सर्व जुने तेल आता वापरले गेले आहे किंवा विकले गेले आहे.
तेल खरेदीसाठी ३० दिवसांची सूट देण्यात आली होती
१२ मार्च रोजी, अमेरिकेच्या अर्थ विभागाने भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांना आधीच भरलेले रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी देण्यासाठी ३० दिवसांसाठी वैध असलेली एक तात्पुरती सूट जाहीर केली होती.
सवलतीची घोषणा करणाऱ्या एका निवेदनात बेसेंट म्हणाले, जागतिक बाजारपेठेला तेलाचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी, ट्रेझरी डिपार्टमेंट भारतीय रिफायनर्सना रशियन तेल खरेदी करण्याची परवानगी देण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत देत आहे.हा निर्णय रशियाच्या फायद्यासाठी नाही. यामुळे केवळ निर्बंधांच्या वेळी समुद्रात असलेल्या जहाजांना त्यांचा जुना माल विकण्याची परवानगी मिळते. यामुळे रशियाला कोणताही नवीन फायदा होणार नाही.
अमेरिकेने या तात्पुरत्या सवलतीचे वर्णन जागतिक ऊर्जा किमती, विशेषतः कच्च्या तेलाच्या किमती स्थिर करण्यासाठी एक आवश्यक पाऊल असे केले होते. फेब्रुवारीच्या अखेरीस, अमेरिका-इराण संघर्षामुळे तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेल्या होत्या. वॉशिंग्टनने इतर देशांना इराणी तेल खरेदी करण्याची परवानगी देणारा ३० दिवसांचा परवाना जाहीर केला होता. रशियन तेलासाठीची सवलत ११ एप्रिल रोजी संपली, तर इराणी तेलासाठीची सवलत १९ एप्रिल रोजी संपेल.
