उत्सुकता वाढली…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8:30 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. संसदेत काल महिलांसाठी राखीव जागांबाबतच्या विधेयकाला विरोधी पक्षांनी अडथळा आणल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
त्यामुळे या संबोधनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
या संबोधनाचा नेमका विषय काय असेल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र काल संसदेत घडलेल्या घडामोडींनंतर पंतप्रधान कोणती भूमिका मांडतात आणि पुढील दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
महिलांसाठी संसद आणि राज्य विधानसभांमध्ये आरक्षण देण्याची प्रतीक्षा पुन्हा एकदा लांबली आहे. कारण 131वा घटनादुरुस्ती विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकाचा उद्देश 2029 पासून विधानमंडळांमध्ये महिलांसाठी आरक्षण लागू करणे तसेच लोकसभेतील जागांची संख्या वाढवणे हा होता. मात्र या प्रस्तावाला आवश्यक तेवढा पाठिंबा मिळू शकला नाही.
एकूण 528 सदस्यांनी मतदान केले त्यापैकी 298 सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केले तर 230 सदस्यांनी विरोधात मतदान केले. घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यासाठी 352 मतांची गरज होती. जी या विधेयकाला मिळाली नाही.
विधेयकाला आवश्यक बहुमत न मिळाल्यानंतर सरकारने लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना इतर दोन प्रस्तावित कायद्यांवर पुढे न जाण्याची विनंती केली. यामध्ये ‘डिलिमिटेशन विधेयक, 2026’ आणि ‘केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, 2026’ यांचा समावेश होता.
या घटनादुरुस्ती विधेयकानुसार लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या 543 वरून जास्तीत जास्त 850 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव होता. 2029 च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी महिलांसाठी आरक्षणाची अंमलबजावणी सुलभ व्हावी यासाठी ही वाढ करण्यात येणार होती.
हा प्रस्ताव 2011च्या जनगणनेवर आधारित मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) प्रक्रियेशी जोडलेला होता. तसेच, राज्य विधानसभांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानमंडळांमध्येही जागांची संख्या वाढवून महिलांसाठी 33 टक्के आरक्षण सुनिश्चित करण्याचा यामध्ये समावेश होता.
विधेयक संसदेत मंजूर न झाल्याने आणि पुढील पावले काय असतील याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने आता सर्वांचे लक्ष आज रात्री होणाऱ्या पंतप्रधानांच्या संबोधनाकडे लागले आहे. राजकीय वातावरण तापलेले असताना हे संबोधन होणार असून त्याचा नेमका अजेंडा अद्याप स्पष्ट झालेला नाही.
