ठाणे प्रतिनिधी (नागेश पवार) दिवा: महापालिका प्रशासनाकडून एकीकडे अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्याचे दावे केले जात असताना, दिवा प्रभाग समितीमध्ये मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतः जागामालकाने आपल्या जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार केल्यानंतरही, प्रशासनाने केवळ ‘सोयीस्कर’ कारवाई केल्याचे उघड झाले आहे. पाचपैकी फक्त दोन खोल्या जमीनदोस्त करून उर्वरित तीन खोल्या तशाच ठेवल्याने पालिका प्रशासन आणि भूमाफिया यांच्यात ‘साठेलोटे’ असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
दिवा येथील एका जमिनीवर ‘शुक्ला’ नावाच्या इसमाने अनधिकृतपणे पाच खोल्यांचे बांधकाम केले होते. या विरोधात मूळ जागामालकाने प्रभाग समितीकडे रीतसर लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत पालिकेचे पथक आणि जेसीबी कारवाईसाठी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, यावेळी झालेल्या कारवाईने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कारवाई दरम्यान जेसीबीने केवळ दोनच खोल्या पाडल्या. उर्वरित तीन खोल्या सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘या खोल्यांमध्ये महिला राहतात’ असे अजब कारण दिल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. परंतु, प्रत्यक्षात या सर्व खोल्या रिकाम्या असून त्यांना बाहेरून कुलूपे लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी कारवाई झाली तिथे केवळ परप्रांतीय मजूर वास्तव्यास असून, महिलांचा कुठेही मागमूस नाही.
जागामालकाचे सवाल:
१.जर पाचही खोल्या अनधिकृत होत्या, तर तीन खोल्यांवर मेहरबानी का?
२.मोकळ्या खोल्यांमध्ये ‘महिला’ असल्याचे सांगून कारवाई का टाळली?
३.कारवाईच्या वेळी संबंधित बिल्डर अधिकाऱ्यांसोबत काय करत होता?
“प्रशासनाने केलेली ही कारवाई म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. अनधिकृत बांधकामांना पालिकेचे छुपे पाठबळ मिळत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे. सर्व खोल्या रिकाम्या असतानाही केवळ काही खोल्यांवर कारवाई करणे, यात मोठे आर्थिक व्यवहार झाले असावेत असा संशय येतो.” – तक्रारदार जागामालक
या प्रकरणामुळे दिवा विभागात अनधिकृत बांधकामांच्या विरोधात होणाऱ्या कारवाईच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देऊन राहिलेल्या बांधकामावर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
