पराभूत असलेले अटी लादू शकत नाही !
इस्लामाबादमध्ये अमेरिका व इराणच्या शिष्टमंडळात दोन आठवड्यांपूर्वी शांतता चर्चा झाली पण ती फिस्कटली. त्यानंतर आज दोन्ही देशांमधील युद्धविरामाची मुदत संपत असून युद्धाला पुन्हा सुरुवात होणार अशी चिंता होती.
कारण ही शस्त्रसंधी वाढवणार नाही, इराणला आमचं ऐकावचं लागेल अशी धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देत होते. मात्र अचानक यू-टर्न घेत इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली.
मात्र अमेरिकेकडून होर्मुजमधील नाकेबंदी कायम ठेवण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. यातच आता इराणने अमेरिकेवर टीका करत ही शस्त्र संधी फेटाळली आहे. ‘आम्ही हा एकतर्फी निर्णय स्वीकारणार नाही आणि आमच्या राष्ट्रीय हितानुसारच कार्यवाही करून पुढील रणनिती आखू’, असं तेहरानकडून स्पष्ट करण्यात आलं.
इराणच्या संसदेतील अध्यक्षांचे सल्लागार महदी मोहम्मदी यांनीही ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. “ट्रम्प यांनी शस्त्रसंधीमध्ये जी मुदतवाढ केली निरर्थक आहे. पराभूत मानसिकता असलेले कोणत्याही अटी लादू शकत नाहीत,” असं ते म्हणाले. एकंदर पाहता इराण माघार घेण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे यावरून दिसत आहे.
नेमकं काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटले की, ‘इराणच्या सरकारमध्ये मोठी फूट पडलेली आहे. हे होणं अपेक्षितच होतं. त्याचबरोबर पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या विनंतीवरून आम्ही इराणवरील हल्ले पुन्हा काही दिवसांसाठी थांबवत आहोत. हे हल्ले तोपर्यंत थांबवण्यात आले आहे. जोपर्यंत त्यांचे प्रतिनिधी एकमताने एखादा प्रस्ताव घेऊन येत नाहीत.’ याशिवाय ट्रम्प यांनी होर्मुजमधील नाकेबंदी कायम ठेवली असल्याचेही सांगितले आहे.
पाकिस्तानने ट्रम्प यांचे मानले आभार
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला या युद्धविराम वाढवण्याचे श्रेय दिल्याने पाकिस्तानने ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. पाकिस्तान म्हणाला आहे की, युद्धविराम वाढवण्यासाठी पाकिस्तानची विनंती मान्य केल्याबद्दल आणि त्यामुळे सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांना पुढे येण्याची संधी दिल्याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानतो. दुसरीकडे, इराण-अमेरिकेतील चर्चेसंदर्भातील चित्र अजूनही स्पष्ट नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांचा इस्लामाबाद दौरा रद्द करण्यात आला आहे. तसेच इराणकडूननही हे स्पष्ट करण्यात आलं आहे की ते आपलं शिष्टमंडळ पाठवणार नाहीत.
