भाजप नेत्याचा व्हिडिओ शेअर करत हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल…
संसदेत महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक फेटाळलं गेल्यानं संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपनं काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात वरळीत महिलांच्या भव्य निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं.
या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांची गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली, यामुळं या कोंडीत अडकून पडलेल्या एका उच्चभ्रू मुंबईकर महिलेचा संताप अनावर झाला आणि तिनं थेट मंत्री गिरीश महाजन यांच्यावर संताप व्यक्त केला. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आता हा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
‘महिलांच्या सशक्तीकरणाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या, आरक्षणाचा मुद्दा पुढे करून महिलांची दिशाभूल करणाऱ्या आणि त्यांना केवळ राजकीय साधन म्हणून वापरत खोटे नॅरेटिव्ह पसरवणा-या भाजपाचा खरा चेहरा या भगिणीने वरळीहून निघालेल्या मोर्चासमोर जाऊन उघडा पाडला आहे.
महिला आरक्षणाच्या आडून संविधान आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याचा भाजपाचा डाव ‘इंडिया’ आघाडीने आधीच हाणून पाडला होता. त्यानंतर आता मोर्चे आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू होता; मात्र या धाडसी भगिनीने तोही डाव उधळून लावला आहे.आज फक्त मंत्री गिरीश महाजन यांना पळवून लावले आहे. येणाऱ्या काळात देशातील महिला अशाच प्रकारे भाजपाला सत्तेतून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपा भगाओ, देश बचाओ!’ असं ट्विट सपकाळ यांनी केलं आहे.
नेमकं काय घडलं?
लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीने मुंबईतील वरळी डोम येथे ‘जन आक्रोश महिला संमेलन’ आयोजित केले होते. यासाठी वरळीत मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग आणि भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यामुळं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली.
राजकीय हेतून केल्या जाणाऱ्या अशा आंदोलनामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं तुमचं हे काय चाललं आहे? गेट आऊट फ्रॉम हेअर (इथून निघून जा) अशा शब्दांत एका मुंबईकर उच्चभ्रू महिलेनं थेट भाजपच्या मोर्चामध्ये शिरुन थेट मंत्र्यांना याबाबत जाब विचारला.
इथं उपस्थित असलेल्या गिरीश महाजन यांच्यावर ही महिला चांगलीच संतापली. या आंदोलनामुळं सर्वसामान्य जनतेचा वेळ आणि इंधन वाया जात असल्याचा मुद्दा या महिलेनं आक्रमकपणे मांडला.
दरम्यान, या महिलेनं पोलीस अधिकाऱ्यांना देखील जाब विचारला, इथं या मोर्चामुळं वाहतूक कोंडी झालेली असताना तुम्ही काय बघ्याची भूमिका घेत आहात? असा सवालही या महिलेनं विचारला. पोलीस अधिकारी या महिलेला गिरीश महाजनांजवळ जाण्यापासून रोखत होते. पण या महिलेनं माझ्या अंगाला कोणीही हात लावायचा नाही, अशा शब्दांत पोलिसांनाच इशारा दिला. त्यानंतर संताप व्यक्त करत ही महिला तिथून स्वतःहूनच बाहेर निघून गेली
