बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार प्रकृती अस्वस्थामुळे मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत. त्यांनी या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते.
दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले होते.
दरम्यान, बुधवारी रात्री पार्थ पवार यांनी शरद पवारांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘आजोबा, लवकर बरे व्हा! तुम्हाला शक्ती, आराम आणि लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आम्ही सर्वजण तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठींबा दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे की, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवारसाहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत.
बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली.आदरणीय साहेबांनी केलेल्या आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. बारामतीची जनता विकासाच्या विचारांशी जोडलेली आहे आणि तीच दिशा पुढेही कायम राहील.आदरणीय साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना!’, असे देखील सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवारांचे आवाहन
आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी.
बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.
