भारताबाबत आक्षेपार्ह टिप्पणी; वाचाल तर संतापाने पेटून उठाल…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे नव्या वादाला तोंड फोडले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर कट्टरपंथी अमेरिकन लेखक आणि समालोचक माइकल सॅवेज यांच्या एका जुन्या व्हिडिओतील मजकूर पोस्ट केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
माइकल सॅवेज यांनी १ एप्रिल रोजी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर ‘बर्थराइट सिटिझनशिप’ (जन्मसिद्ध नागरिकता) या विषयावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या नागरिकत्व कायद्यावर टीका करताना भारतविरोधी विधाने केली होती. सॅवेज म्हणाले होते की, लोक गरोदरपणाच्या ९ व्या महिन्यात विमानातून अमेरिकेत येतात, इथे मूल जन्माला येते जे तात्काळ नागरिक बनते. त्यानंतर ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला चीन, भारत किंवा पृथ्वीवरील इतर कोणत्याही नरकातून इथे घेऊन येतात.
ट्रम्प यांचा चिथावणीखोर, भारतविरोधी वक्तव्याला पाठिंबा…
विशेष म्हणजे, ज्या व्हिडिओला केवळ १२ हजार व्ह्यूज होते, त्यातील मजकूर ट्रम्प यांनी अक्षरश: ४ पानांमध्ये लिहून आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. राष्ट्राध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीने अशा वांशिक आणि द्वेषपूर्ण विधानांना प्रसिद्धी दिल्याने, त्यांनी एकप्रकारे या विचारांवर आपली मोहोर उमटवली असल्याचे मानले जात आहे. सॅवेज यांनी आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले की, सध्या अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांमध्ये देशाबद्दल कोणतीही निष्ठा उरलेली नाही आणि अनेक ठिकाणी आता इंग्रजीही बोलली जात नाही.
CNBC ला दिलेल्या मुलाखतीत महागाई आणि नागरिकत्वाबाबत खोटे दावे केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी हे वंशभेदी विधान रिपोस्ट केले आहे. भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे दावे करणाऱ्या ट्रम्प यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे जागतिक स्तरावर, विशेषतः भारतीय समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
