वरळीमध्ये भाजपच्या मोर्चामुळे झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना मंगळवारी घडली आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा झाली.
वरळी डोम परिसरात लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या निषेधार्थ भाजप महायुतीने मोर्चा काढला होता. ऐन वाहतुकीच्या वेळी मोर्चा निघाल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. आपल्या मुलाला शाळेतून घेण्यासाठी निघालेली एक महिला या कोंडीत अडकली. संतापलेल्या तिने गाडीतून उतरून थेट मंत्री महाजन आणि पोलिस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. “इथून निघून जा, गाड्यांची रांग लागली आहे, हे तुम्हाला समजत नाही का?” असा जाब तिने विचारला. तिने मोर्चा खुल्या मैदानात का घेतला नाही, असा सवालही केला.
मंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना वाहतूक कोंडीसाठी खेद व्यक्त केला. “मी वैयक्तिकरित्या त्या महिलेची माफी मागितली. आम्ही १०-१५ मिनिटांत निघणार होतो, पण त्या वैतागल्या होत्या. शिव्या दिल्या, अयोग्य भाषा वापरली आणि रागात बाटली फेकली,” असे महाजन म्हणाले. तरीही त्यांनी पोलिसांना तिच्यावर कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले.
वरळी पोलिस ठाण्यात तक्रार
दरम्यान, या घटनेच्या दुसऱ्या दिवशी वकील गणरत्न सदावर्ते यांच्या मुलीनेन झेन सदावर्ते यांनी वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. शासकीय कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी मोर्चा आयोजकांवरही सार्वजनिक गैरसोय केल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.
ती महिला नेमकी कोण आहे?
फ्री प्रेस जनरलने तिच्या मर्सिडीज कारच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे तिची ओळख पटवली. या महिलेचं नाव श्रीमती ग्रेवाल असल्याचं समोर आलं आहे. त्या आपल्या गाडीतून खाली उतरून मोठ्या आवाजात प्रशासनाला जाब विचारताना दिसल्या. त्या सुमारे एका तासापासून वाहतूक कोंडीत अडकल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे, त्या आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
