‘त्या’ 562 रिक्षाचालकांविरोधात नोटीस काढणार…
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मे पासून व्यवहारिक मराठी सक्तीच्या निर्णयाला राज्य सरकारने 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी तुम्हाला प्रवाशांनी बोललेले मराठी समजत नसेल किंवा बोलता येत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी परप्रांतीय चालकांना पुन्हा सुणावले. तसेच, त्यांनी मीरा भाईंदरमधील 562 रिक्षा चालकांविरोधात नोटीस काढणार असल्याची घोषणा केली.
एका पत्रकार परिषदेत बोलताना सरनाईक यांनी म्हटले की, काल चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मराठी भाषा आली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. व्यवसाय केला पाहिजे, पण राज्यात मराठी बोलण्याचे बंधन आहे.
राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत. आपली मोहीम सुरु ठेवायची आहे. परिवहन विभागाच्या नियमांचे उल्लंघन केले तर कारवाई केली जाईल. 1 मे ते 15 ऑगस्ट या काळात ही मोहीम राबवली जाईल.
या काळात आम्ही थेट कारवाई करणार नाही, पण ही मोहीम सुरु राहील. 100 दिवसांच्या या मोहीमेत सगळे रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठी बोलतील. 100 दिवसांत कोणी जुजबी मराठी शिकू शकले नाही तर मग आपण बघू. परिवहन खात्यात तशी तरतूद आहे.
कोणी कितीही दबाव टाकला, कोणी कितीही बंदचे हत्यार उपसले, कोणी कितीही आंदोलन करु म्हटले तरी महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकलेच पाहिजे. आम्ही शिकवायला तयार आहोत, शिकून घ्या. कोणी मराठीत पीएचडी करा, एम.ए. करा, असे आम्ही सांगत नाही.
पण प्रवाशांशी संवाद साधताना ते काय बोलत आहेत, हे तुम्हाला कळाले पाहिजे, तुम्ही काय बोललात हे प्रवाशांना कळाले पाहिजे. इतकी मराठी तुम्हाला आली पाहीचे, असे सरनाईक म्हणाले.
