
मानवी जीवनाला अज्ञान, अंधश्रद्धा,रूढी, प्रथा परंपरा च्या जोखडातून बाहेर काढून खंगलेल्या निष्ठावान निर्बल समाजात विद्रोहाचा निखरा फुलविणारे, समता नायक श्रमजीवी कष्टकऱ्यांचे उद्धारकर्ते, स्त्री शक्तीचे पुरस्कर्ते, बालविवाह,सतीप्रथाचे खंडन करणारे, आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते,देहविक्री करणाऱ्या स्त्रियांनाही सन्मानाने व नैतिकतेने उभे करणारे, शिक्षणाचा आग्रह धरून चातुरवर्णाला विरोध करणारे, गुलामगिरीविरुद्ध पेटून उठणारे ज्ञानसूर्य परिवर्तनाचे अग्रदूत, क्रांतीसुर्य विद्रोही महात्मा बसवेश्वर म्हणजे लोककल्याणकारी महामानवच होत.
महात्मा बसवेश्वर यांचा जन्म वैशाख शुद्ध तृतिया म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतियेच्या दिवशी 1106 (शके 1029) मध्ये इंगलेश्वर (जि. विजापूर, कर्नाटक) येथे झाला. त्यांच्या जन्माअगोदर माता-पित्यास नंदीकेश्वरांचा आशीर्वाद लाभल्यामुळे त्यांचे नाव ‘बसव’ असे ठेवण्यात आले.वयाच्या आठव्या वर्षीच बसवेश्वर यांना सामाजिक परिस्थितीचे ज्ञान झाले. यातूनच ते घर सोडून थेट कुडल संगमेश्वराच्या दर्शनाला गेले. तेथेच श्रीजात वेद मुनी शिवाचार्य यांचे शिष्यत्व पत्करून वीरशैव धर्माच्या तत्त्वाची ओळख करून घेतली.
क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होऊन समाजात होत असलेल्या अन्याय अत्याचार विरुद्ध बंड पुकारून समतेचे तत्व अंगी करण्याचे काम महात्मा बसवेश्वरांनी केले.क्रांती म्हणजे केवळ एखादा उठाव किंवा रक्तरंजित लढा नव्हे तर अस्तित्वात असणारी परिस्थिती संपूर्ण नष्ट करून त्या जागी नव्या आणि जास्त सुयोग्य पायावर आधारित अशा समाजाच्या पद्धतशीर पुनर्रचनेसाठी लिंगायत धर्माची स्थापना करून समाजाला नवचैतन्य निर्माण करून दिले.
क्रांती म्हणजे एखादी मेजवानी देणे एखादे चित्र काढणे किंवा सुईने विणकाम करणे नाही आहे. क्रांती सोम्य मृत्यू किंवा शिष्टाचार युक्त असू शकत नाही.क्रांती एक बंड आहे. ज्यामध्ये एक वर्ग दुसऱ्या वर्गाचे खाली डोके वर पाय करून त्याला उलटे करून टाकते.त्यांच्याही विरोधात बंड करून उठणारे,समाज सत्तेत अशी वरात सत्तेशी प्रचंड संघर्ष करणारे, भारताच्या गौरवशाली इतिहासातील समाज सुधारक युगपुरुष म्हणजे महात्मा बसवेश्वर होत.
मानवी जीवनातील ज्ञान हे श्रेष्ठ मूल्य आहे.ही व्यक्ती व समाजाची शक्ती आहे. त्यामुळे सामाजिक विकासाला व परिवर्तनाला गती मिळते .परंतु या बौद्धिक संपदेवर भारतात विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी महात्मा बसवन्ना यांनी बहुजन समाजाला शिक्षित केले. स्त्रियांनाही शिक्षणाची दारे खुली केली. दलित, कष्टकरी, शेतकरी गुराखी,वेश्या व शूद्र या सर्वांना एकत्र आणून 770 शरणांची मांदियाळी जमविली.अनुभव मंटपात चर्चा करून वचन साहित्य निर्माण केले . ज्यावेळी वेदविद्या पठाण करण्याचा अधिकार काही मोजक्या लोकांना होता शिक्षणाची दारे ही सर्वांसाठी खुली नव्हती वैदिकांची बौद्धिक मक्तेदारी संपुष्टात आणून ज्ञानाची गंगा बहुजनांच्या दारी नेण्याचे कार्य बसवण्णानी बाराव्या शतकात केले.बसवण्णांनी मंगळवेढा येथे “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली.( बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक ,समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते. आजोबा पण लोकशाहीचा गाजावाजा करतोय ती खरी लोकशाही सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवात ही म.बसवेश्वरांनी केली.
बसवेश्वरांच्या काळात जातिभेद, धर्मभेद, स्त्री भेद करून स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले होते .त्याकाळी धर्ममार्तंडांनी समाजव्यवस्थेत स्त्रीला शुद्र समजले.तिला मोक्ष नाही, स्त्रीला वारसा हक्क नाही, स्त्रीवर अन्याय होता,हे ओळखून त्यांनी स्त्रीला शिक्षित केले,चालते-बोलते केले.मत स्वातंत्र्याचा अधिकार दिला. आध्यात्मिक उपासनेची परवानगी दिली.जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उद्धारी या विचाराने प्रेरित होऊन स्त्रियांना मानाचे स्थान देण्याचे काम महात्मा बसवेश्वरांनी केले. बसवेश्वरांच्या कार्यामुळे प्रेरित होऊन नंतर अक्क दहादेवी,राणी महादेवी, मुक्तायका,नागलंबिका आदी अनेक स्त्री संत नावारूपाला आल्या.स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालू शकते हे महात्मा बसवेश्वर यांनी सिद्ध करून दाखवले स्त्री ही अबला नसुन ती सबला होऊ शकते, हे बसवेश्वरांनी जगाला दाखवून दिले.ज्या काळामध्ये जातीभेद टोकाचा होता धर्म भेद होता स्वतःच्या जातीला सोडून इतरत्र कुठल्याही जातीत तेव्हा विवाह करता येत नव्हता. कोणी असा विचारही करत नव्हती आणि कुणी केला तर त्याला जातीय व्यवस्थेतून बाहेर काढले जात होते तत्कालीन समाजव्यवस्थेला व राजसत्तेला हादरवून टाकणारा आंतरजातीय विवाह त्यांच्या पुढाकाराने घडला. हे क्रांतिकारी पाऊल महात्मा बसवेश्वरांनी केले आज अनेक तरुण मुलं-मुली आंतरजातीय विभाग करून महात्मा बसवेश्वरांच्या या विचाराने प्रेरित झालेली बघायला मिळतात. जातीभेद विसरुनीया एक हो आम्ही हे सर्व स्थळी मूळ नष्ट हो जगातुनी खल नींद कमनीय सत्य न्याय दिसु दे दे वरचि असा दे या भारतात बंधुभाव नित्य वसु दे ही संकल्पना लोककल्याणकारी महात्मा बसवेश्वरांनी मांडली
महात्मा बसवेश्वर हे केवळ बोलके सुधारक नव्हते तर ते प्रत्यक्षात कर्ते सुधारक होते.त्यांनी जातीधर्मातील दरी कमी करण्यासाठी सर्व धर्म समभाव निर्माण करण्यासाठी मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत व मधुररस ब्राह्मण मंत्र्याची मुलगी कलावती यांच्यात विवाह घडवून आणला. एवढा मोठा क्रांतिकारक बदल कोणीही या काळात करू शकले नाही आजची तरुण पिढी आंतरजातीय विवाह करते याची सुरूवातच महात्मा बसवेश्वरांनी केली हे आम्हाला विसरता येत नाही. म्हणून ते आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार करणारे होते.
जाती पातीच्या भिंती तोडून टाकण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. समता वादाची विचारसरणी आजच्या समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार मार्कस-एंगल्स यांच्या कित्येक शतके आधी केला.श्रम सिद्धांताला केवळ आर्थिक बैठक देऊन ते थांबले नाहीत, तर श्रम सिद्धांताला त्यांनी आध्यात्मिक बैठकीची जोड दिली. या युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वरांनी कर्म सिद्धांताला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले यास कर्माला अध्यात्मिकतेची जोड दिली तर माणूस यशस्वीपणे काम करतो म्हणून त्यांनी कर्म हे सर्वश्रेष्ठ समजून त्यांनी कर्माला महत्त्व दिले. कोणतेही काम लहान-मोठे नाही. मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना हे त्यांच्या कायक वे कैलास सिद्धांताचे सार यात सांगीतले.महात्मा बसवेश्वरांच्या कृतिशील वैचारिक चळवळीचा प्रभाव तत्कालीन समाजव्यवस्थेवर पडला आणि जातीपातींच्या भिंती गाडून लाखोंच्या जनसमूहाने ‘लिंगायत’ धर्मात प्रवेश केला. धर्मातराची एवढी मोठी घटना भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली.
महात्मा बसवेश्वरांनी जनसमुदायात अध्यात्म पेरण्यासाठी ‘शिवानुभवमंडप’ नावाच्या आध्यात्मिक विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाद्वारे बसवेश्वरांनी विश्वशांती आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देऊन आत्मोद्धाराचे आणि लोकोद्धाराचे मानवतावादी कार्य केले. मानवतेचा एवढा मातृहृदयी कनवाळू मायाळू या त्यांच्या कार्यामुळे बसवेश्वरांना विश्वगुरु, विश्वविभूती, भक्तिभंडारी, क्रांतिकारी, महामानव, वचनकार, महात्मा अशा पदव्या मिळाल्या. ते खऱ्या अर्थाने मानवतेचे पुजारी व कल्याणकारी युगप्रवर्तक बहुजनांचे कैवारी ठरले.
धर्मांध होण्यापेक्षा स्वतःची कर्म सर्वश्रेष्ठ समजून काम करा त्यातच ईश्वर आहे तसेच समाजाला समजून सांगत.त्यात शरीरश्रम, बौद्धिकश्रम, पैसा गुंतवणूक, सेवा आणि शुभ चिंतन अथवा आशीर्वाद (उपदेश) या पाच तत्त्वांना प्राधान्य दिले.कर्म, क्रिया हा सजिवाचा सर्वोच्च गुणधर्म आहे. जगाचे अस्तित्त्व क्रिया, कर्मावर आधारलेले आहे. म्हणूनच क्रिया थांबली की जग शून्य ठरते! श्रम हाच स्वर्ग आहे. हिच मुळी समस्त मानवाचा गुणधर्म असल्याचा मौलिक विचार बसवेश्वरांनी जगाला दिला. कायक सिद्धांत पाळताना पैशामुळे तफावत निर्माण होण्याचा धोकाही बसवेश्वरांना माहीत होता. गरजेपेक्षा जास्त पैशातूनच श्रीमंत- गरीब असा विरोधाभास निर्माण होतो. पैशामुळे व्यवस्थेत बाधा होऊ नये या हेतूने ‘दासोद’ हा विचार मांडला. दैवाने दिले असेल तर दैवाला अर्पण झाले पाहिजे. यातच निरहंकारी भावना जपणे आवश्यक आहे. ‘दासोद’ द्वारे असमर्थ व्यक्तीच्या पालनपोषणाची सोय व्हावी असा मनोदय बसवेश्वरांनी व्यापक दृष्टीने केला आहे.बसवेश्वरांची विचारसरणी व त्यांनी समाजासाठी घालून दिलेल्या तत्त्वाप्रमाणे वीरशैव धर्माची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. त्यांची विचारसरणी ही तंतोतंत लोकशाही मूल्यांशी निगडित आहे.म्हणूनच ते महान विश्वविभूती, विश्वज्योती व विश्वगुरू,स्त्री उद्धारक, मध्ययुगीन हिंदुस्थानचे जनक, पर्यावरणवादी आदी विशेषणांनी ओळखले जातात. त्यांचे चरित्र हे समाजाला नवी दिशा व प्रेरणा देणारे असून सूर्य चंद्र तारे असेपर्यंत त्यांचे अनमोल कार्य केवळ भारतालाच नव्हे तर विश्वाला प्रेरित करणारे आहे…….
प्रा.मारोती बुद्रुक पाटील.
अहमदपूर.
मो.9146411111.