
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : अदानी समूहाची एफएमसीजी कंपनी ‘अदानी विल्मर’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अदानी विल्मर आता हिंदुस्थान युनिलिव्हरला मागे टाकून, गेल्या आर्थिक वर्षात विक’मी महसुलाच्या आधारे भारतातील सर्वांत मोठी एफएमसीजी कंपनी बनली आहे.
2021-22 या आर्थिक वर्षात अदानी विल्मरचा वार्षिक महसूल 46.2 टक्क्यांनी वाढला.
अदानी Adani Wilmer समूहाच्या कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात खाद्यतेलांचा फायदा झाला आहे. या कालावधीत कंपनीला 54,214 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल 37,090 कोटी रुपये होता. दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हरचा महसूल 2021-22 या आर्थिक वर्षात 51,468 कोटी रुपये आहे. अशाप्रकारे अनेक दिवसांपासून पहिल्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हरला अदानी विल्मरने मागे टाकले आहे.
अदानी विल्मरने अलिकडेच पॅकेज्ड फुड व्यवसायात प्रवेश केला आहे. पॅकेज्ड फुडचा व्यवसाय वाढवण्यासाठी अदानी विल्मरने नवा करार केला. यात अदानी विल्मरने अमेरिकन कंपनी मॅककॉर्मिककडून पॅकेज्ड फुड ब्रँड ‘कोहिनूर’ कंपनी विकत घेतली. या करारात अदानीला केवळ अमेरिकन कंपनीचा प्रीमियम बासमती तांदळचा ब्रँड मिळाला नाही, तर चारमिनार आणि ट्राफीसारखे छत्री ब्रँडही त्याच्या वाट्याला आले आहेत. सध्या या ब्रँडची एकत्रित किंमत सुमारे 115 कोटी रुपये आहे.