
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पालघर जिल्ह्यातील अग्रणी वित्तसंस्था म्हणून ओळख
जव्हार:पालघर जिल्ह्यातील अग्रणी पतसंस्था अशी ओळख असलेली जनकल्याण पतसंस्थेचे नवीन वास्तूचे उद्घाटन अक्षय्य तृतीयाचे औचित्य साधून संपन्न झाले.सुमारे २१ वर्षांपूर्वी जव्हार ह्या आदिवासी बहुल भागातील आदिवासी व इतर समाजातील नागरिकांचे व व्यावसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांनी ०९ नोव्हेंबर २००१ रोजी पतसंस्थेची या स्थापना केली.
ही पतसंस्था धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठाणच्या माध्यमातून इयत्ता १० वी सराव परीक्षेचे आयोजन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन,ग्रामीण भागातील जनतेसाठी मोबाईल चार्जिक स्टेशन उभारणी करणारी एकमेव संस्था,एकवीस वर्षापासून सहकार क्षेत्रात अग्रणी असलेली संस्था,पहिल्या दिवसापासून संपूर्ण संगणकीकृत असलेली जव्हार तालुक्यातील पहिली पतसंस्था,सतत १७ वर्ष ऑडिट,अ वर्ग ठेवी,कर्ज वाटप,नफ़ा,कर्ज वसूली,सामाजिक व शैक्षणिक उपक्रम या सर्वच बाबतीत अग्रेसर असलेली पतसंस्था, खातेदारांना एस.एम.एस.सुविधा देणारी तसेच सर्वसामान्य माणसाची हक्काची बँक व अत्यंत सुलभ पध्दतीने कर्ज उपलब्धता असा नावलौकिक असलेल्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुतन वास्तूचे उदघाटन विधानपरिषदेचे सदस्य आमदार रविंद्र फाटक, आमदार सुनील भुसारा,आमदार श्रीनिवास वनगा,सामाजिक कार्यकर्ते नीलेश सांबरे,जव्हार नगरपरिषदेचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल,बँकेचे संस्थापक माजी नगराध्यक्ष दिनेश भट,बँकेचे अध्यक्ष सुनील जाधव,उपाध्यक्ष डॉ. प्रतिभा सदगीर,नगरसेवक प्रसन्न भोईर तसेच बॅंकेचे सर्व संचालक,जव्हार शहरातील नगरसेवक,नागरिक,बँकेची अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी आमदार श्रीनिवास वनगा यानी बोलतांना सांगितले की,माझे वडील दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे साक्षीने सुरू झालेल्या बॅंकेचे माझ्या हस्ते उद्घाटन होणे हे माझं भाग्य आहे.तर आमदार भुसारा यांनी यावेळी बोलताना सांगितले की संस्थेचे संस्थापक दिनेश भट यांच्या कार्याबाबतीत गौरव उद्गार काढून तसेच जव्हार भागात येत्या काळात जिल्हा रुग्णालय निर्माण होईल असे सूतोवाच त्यांनी केले.
यावेळी आमदार रविंद्र फाटक यांनी सांगितले की,दिघे साहेबांच्या स्वप्नातील ही पतसंस्था असून,कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण न होता नागरिकांना सेवा उपलब्ध होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जव्हार वर प्रेम असून,पर्यटन विकास कडे ते लक्ष देत आहेत.या संस्थेचे २५ कोटी ठेवी ही १०० कोटीच्या वर जावे असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
या नेत्रदीपक नववस्तू उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन अरविंद भोईर यांनी तर आभार प्रदर्शन नरेश महाले यांनी केले.