
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे : पक्षातील व्यक्तींशी सौहार्दता जपणे ही आपली राजकीय संस्कृती आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नेते अंकुश काकडे लिखित आणि उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला. पक्षीय निष्ठा कायम राखत सर्व राजकीय पक्षातील व्यक्तींशी सौहार्दता जपणे ही महाराष्ट्राची आणि खास करून पुण्याची राजकीय संस्कृती आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नेते अंकुश काकडे लिखित आणि उत्कर्ष प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘हॅशटॅग पुणे पुस्तकाचे प्रकाशन आज ( रविवारी ) शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मतभिन्नतेचे रूपांतर मनभेदमध्ये करु नका’ : राजकारणात मतभेद आणि वैचारिक भिन्नता असते. परंतु त्या मतभेदांचे आणि मतभिन्नतेचे रूपांतर मनभेदामध्ये होता कामा नये. राजकीय नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत भूमिका घेऊन आदर्श प्रस्थापित केला पाहिजे. ज्या कोणाला पुण्याची नस आणि पुण्याची गुणसुत्रे जाणून घ्यायची आहे, त्यांनी हे पुस्तक आवर्जुन वाचावे. या पुस्तकात पुण्याच्या अमृततुल्य पासून तर पुण्यात साजरा होणारा गणेशोत्सव, उर्स या सगळ्यासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आढावा घेतला आहे. हे पुस्तक म्हणजे पुण्याचे सर्वांगिण दस्तावेजीकरण आहे. पुणे झपाट्याने बदलत असून शैक्षणिक संस्था, आयटी हब, औद्योगीकीरण, उद्योग आणि रोजगाराच्या संधी यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.
वाचन संस्कृती कमी होत चालली’ : पुणे हे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र बनत असून शैक्षणिक संस्थांव्दारे शिक्षणाच्या निमित्ताने विविध जाती-धर्माचे विद्यार्थी पुण्यात येतात. त्यांच्या बरोबरीने त्यांचे आचार-विचार आणि संस्कृतीही पुण्यात येत आहे. पूर्वी पेन्शनरांचे पुणे म्हणून ओळखले जाणारे पुणे आयटी, शिक्षण आणि उद्योगाचे हब झालेले आहे. पुण्याने देशाला कायमच विचार देण्याचे काम केले आहे. परंतु, अलीकडे कमी होत चाललेली वाचन संस्कृती आणि कमी होत चाललेला साहित्य व्यवहार ही धोक्याची घंटा आहे. भौतिकदृष्ट्या समाज किती विकसीत आहे. यापेक्षा वैचारिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या समाज किती प्रगत आहे. यावर तो समाज किती पुढे जाईल हे ठरत असते. वाचन संस्कृतीची पाळेमुळे रूजलेल्या पुण्यात ललित साहित्याची उलाढाल प्रचंड मंदावलेली आहे. हातावर मोजण्याइतके ललित साहित्य विक्रेते पुण्यात तग धरून आहेत, असे यावेळी खासदार शरद पवार म्हणाले.