
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – शाम पुणेकर.
पुणे : शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अपुरी संख्या आणि अस्वच्छतेच्या पार्श्वभूमी वर मोठा गाजावाजा करत शहरात यांत्रिकी पद्धतीने चालणारी आणि अत्याधुनिक सुविधा असलेली स्वच्छतागृहे (ई-टॉयलेट्स) सुरू करण्यात आली. मात्र देखभाल दुरुस्ती अभावी त्यांची दुरवस्था झाल्याने बहुतांश ई-टॉयलेट्स बंद अवस्थेत आहेत. संबंधित कंपनीकडून देखभाल दुरुस्ती करण्यास असमर्थता दर्शविण्यात आल्याने आता नव्याने निविदा काढण्यात येणार असून ई-टॉयलेट्सचे स्थलांतर करण्याचे नियोजित असले तरी ही योजनाच गुंडाळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून शहरात पंधरा ठिकाणी स्वच्छतागृहे बसविण्यात आली. जंगली महाराज रस्ता, मॉडेल कॉलनी, भांडारकर रस्त्यावरील हिरवाई गार्डन, गोखले रस्ता , सेनापती बापट रस्ता, विठ्ठलवाडी सिंहगड रस्ता, नीलायम चित्रपटगृहा शेजारील पूल, विमाननगर, वाडिया महाविद्यालयाजवळ आणि तळजाई टेकडी, एलएमडी चौक बावधन अशा १५ ठिकाणी अत्याधुनिक स्वयंचलित ई-टॉयलेट्स बसविण्यात आली आहेत.