
दैनिक चालू वार्ता मुखेड प्रतिनिधी-संघरक्षित गायकवाड
मुखेड/शहरातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सदैव गैरहजर राहतात अशा तक्रारी नित्याच्याच झाल्या असताना कार्यकत्यांनी महसूल विभागाला कळवून उपजिल्हा रुग्णालयाचा पंचनामा करावयास लावला. यावेळी हजेरीपटावरील चोवीस कर्मचाऱ्यांपैकी केवळ सहाच कर्मचारी उपस्थित होते. तर स्टाफ नर्स यांच्या हजेरीपटावर ३९ स्टाफ नर्सपैकी केवळ सहा स्टाफ नर्स उपस्थित होत्या व इतर कर्मचारी गैरहजर आढळून आले. यावेळी तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी करून नाराजी व्यक्त केली. मुखेड तालुका हा क्षेत्रफळाच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो. अत्यंत डोंगराळ भागात वसलेला या तालुक्यात बहुतांश नागरिक वस्ती, वाडी, तांड्यांवर आहे. भागातील या नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा मिळावी म्हणून शासनाने मुखेड शहरात उपजिल्हा रुग्णालयाची स्थापना केली. शंभर खाटांच्या या रुग्णालयात अद्ययावत सुविधाही देण्यात आल्या. मात्र या सुविधा चालविणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे हे रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांची सतंतची गैरहजेरी रुग्णांच्या अडचणी वाढवीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयभीम सोनकांबळे, संभाजी मूकनर व लक्ष्मण सोमवारे उपजिल्हा रुग्णालयात गेले असता त्यांना अनेक कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी अनुपस्थित कर्मचाऱ्यांची तक्रार तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्याकडे केली. तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी स्वतः उपजिल्हा रुग्णालयात येऊन महसूल कर्मचाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठवून उपजिल्हा रुग्णालयातील उपस्थित व आनुपास्थित कर्मचान्यांचा पंचनामा करण्यास सांगितले. यावेळी पंचासमक्ष पंचनामा केला असता यात हजेरी पटावरील चोवीस कर्मचाऱ्यांपैकी केवळ सहा कर्मचारी उपस्थित होते. तर स्टाफ नर्स यांच्या हजेरीपटावर ३९ स्टाफ नर्सपैकी केवळ सहा स्टाफ नर्स उपस्थित होत्या. याचप्रमाणे वर्ग ३ व वर्ग -४ चेही कर्मचारी मोठ्या संख्येने अनुपस्थित होते. विशेष म्हणजे सध्या मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उष्माघाताचे रुग्ण असताना आरोग्य विभागाच्या या कर्मचाऱ्यांकडून कामचुकारपणा केला जात आहे. मुखेडकरांसाठी ही बाब नव्याने नसली तरी वरिष्ठ स्तरावरून या अनुपस्थित कर्मचाऱ्यांना अभय का दिले जाते हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या पंचनाम्यानंतरतरी या कामचुकार कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ स्तरावरून कारवाई केली जाते का असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.