
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे: गेल्या दोन वर्षांपासून जगभर थैमान घालणारे करोना संकट संपत असतानाच, जगातील १५ देशांमध्ये मंकीपॉक्स या कांजण्या सदृश आजाराचे संकट जगावर घोंगावत आहे. पुण्यात अद्याप या आजाराचा संशयित अथवा बाधित रूग्ण आढळलेला नाही. पुणे महापालिके कडून खबरदारीचा उपाय म्हणून डॉ.नायडू रुग्णालयात या संशयीत रुग्णांवरील उपचारासाठी एक वॉर्ड राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दक्षिण आफ्रिकेत माकडापासून आलेला मंकीपाॅक्स हा आजार अनेक देशांमध्ये पसरला आहे. यामध्ये अमेरिका, इंग्लड, आफ्रिका, कॅनडा अशा काही प्रमुख देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. या देशांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या आजाराचे संशयित रुग्ण आढळल्यास त्यांच्या उपचारासाठी डॉ. नायडू रुग्णालयात राखीव वॉर्ड ठेवण्यात आले आहे असे डाॅ. वावरे यांनी सांगून नागरिकांनी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले.