
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
पालघर मधील तलासरीत संमेलनाचे आयोजन
शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधवांची उपस्थिती
जव्हार: अखिल भारतीय जनजाती सुरक्षा मंचाचे(महाराष्ट्र प्रांत)महासंमेलन पालघर मधील तलासरीत शेकडो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत पार पडले.या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नरेश मराड तर संमेलनाचे प्रमुख व्याख्याते म्हणून नंदुरबारचे डॉ.विशाल वळवी उपस्थित होते.आदिवासी समाजाच्या विकासात्मक मागण्यांची मागणी करून या संमेलनात अनेक ठराव पास करून शासन दरबारी मांडणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.दरम्यान अध्यक्षीय भाषणात आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना नरेश मराड यांनी आदिवासी बंधूंचे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात होणारे धर्मांतर ही चिंतेची बाब असून आदिवासी बांधवांच्या अशिक्षित पणाचा गैरफायदा घेऊन अथवा विविध आमिषे दाखवून धर्मांतर केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.ही गंभीर बाब असून राज्याच्या राज्यपालांकडे धर्मांतर केलेल्या बंधूंचे शासकीय आरक्षण,त्यांना मिळणारे लाभ रद्द करून त्यांना आदिवासी समाजातून(डी लिस्टिंग)वगळावे. अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सूतोवाच केले.
तर प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले डॉ.विशाल वळवी यांनी उपस्थित असलेल्या शेकडो आदिवासी बांधवांना संबोधित करताना आदिवासीबहुल भागासाठी असणारा पेशा कायदा पाचवी आणि सहावी अनुसूची याविषयी माहिती देऊन राज्यघटना तसेच आदिवासी संस्कृती कशी टिकून राहील व होणारे धर्मांतर रोखणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी त्यांनी ठासून सांगितले.१९७१-७२ च्या इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले कार्तिक उराव यांच्याविषयी माहिती देताना पहिल्यांदा आदिवासींचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांनी उठाव केल्याचे या वेळी त्यांनी नमूद केले.
आदिवासी समाजात असलेल्या रूढी व परंपरा यांचे दाखले देऊन कोकण प्रांताचे संयोजक विवेक करमोडा यांनी आपल्या आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध असणे गरजेचे आहे असे सूतोवाच त्यांनी केले.तर प्रांत सचिव संतोष जनाठे यांनी आपला आदिवासी समाज निसर्गपूजक असून धरतीला माते समान मानतो.कोणत्याही फसवेगिरीला बळी न पडता आपण आदिवासी आहोत आणि आदिवासी म्हणूनच जगूया असे आवाहन त्यांनी उपस्थित आदिवासी जनतेला केले.
या महासंमेलनात पालघर जिल्ह्यातील जव्हार,विक्रमगड, डहाणू,तलासरी,पालघर अश्या तालुक्यातून शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.