
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-रमेश राठोड
नांदेड – वामनदादा कर्डक हे केवळ महाकवीच नव्हते तर ते आद्य गझलकार म्हणून परिचित होते. सुरेश भटांच्याही आधी वामनदादा यांनी गझला लिहिल्या होत्या. सुरेश भटांसोबत सुद्धा त्यांची भेट झाली होती.वामनदादांच्या काव्यातून सतत आंबेडकरवाद प्रसवत राहिला. वामनदादा कर्डक आंबेडकरी प्रतिभेचे महाकवी होते असे मत अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी व्यक्त केले. ते महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनात आयोजित परिसंवादात बोलत होते. यावेळी मंचावर प्रा. दत्ता भगत, प्रा. सुषमा अंधारे, स्वागताध्यक्ष बालाजी इबितदार, निमंत्रक जी. पी. मिसाळे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कोंडदेव हटकर, राज गोडबोले, भीमराव हटकर आदींची उपस्थिती होती.
सत्यशोधक फाऊंडेशन आणि मानव विकास संशोधन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कुसुम सभागृहात महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात ‘वामनदादा यांच्या गाण्यांतील समग्र आंबेडकरवाद’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी वंजारे बोलत होते. ते म्हणाले की, वामनदादांनी आंबेडकरी साहित्य या संकल्पनेचा पुरस्कार केला होता. त्यांनी त्यांच्या काव्यातून आंबेडकरी भूमिकाच मांडल्या होत्या. आंबेडकरी साहित्य हे मानवमुक्तीच्या लढ्यातून जन्म घेऊन आलेले साहित्य आहे. आंबेडकरी साहित्य हे वेदनेचे, नकाराचे साहित्य नाही तर दु:ख मुक्तीचे साहित्य आहे. व्यवस्थेचा विरोध दर्शवणारं, जगण्याची व्यथा मांडणारं, प्रस्थापितांविरोधात विद्रोह करणारं, परिवर्तनाची भूमिका घेणारं, परंपरांना नकार देणारं एकूणच जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या क्रांतीचं साहित्य हे आंबेडकरी साहित्यच आहे. या भूमिका वामनदादांनी घेतल्या होत्या हे आपण समजून घेणं आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
परिसंवादाचे सूत्रसंचालन इंजि. भीमराव हटकर यांनी केले तर आभार प्रज्ञाधर ढवळे यांनी मानले. परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी एन. डी. गवळे, एन.डी. पंडित, बाबुराव कसबे, प्रभू ढवळे, नितीन एंगडे, डॉ. राम वनंजे, रमेश कसबे, संजय जाधव, ज्ञानोबा दुधमल, राहुल गवारे, एम. एस. गव्हाणे, आर. पी. झगडे, अशोक मल्हारे, नागोराव डोंगरे, शंकर गच्चे, कैलास धुतराज, प्रशांत गवळे, रुपाली वागरे वैद्य, बाबुराव पाईकराव, रणजीत गोणारकर, प्रकाश ढवळे, संतोष तळेगावे, मिलिंद नरवाडे आदींनी परिश्रम घेतले. सभागृहात रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.