
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई -दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये मनी लॉंड्रिंगचा संबंध नाही अशी माहिती राज्याचे मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
दापोलीतील रिसॉर्ट हे सदानंद कदम यांच्या मालकीचे असून त्याच्याशी माझा काही संबंध नाही असंही अनिल परब म्हणाले.
अनिल परब म्हणाले की, “काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर आणि माझ्याशी संबंधित छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. दापोलीचे साई रिसॉर्ट हे सदानंद कदम आहेत, तसा दावा त्यांनी कोर्टात केला आहे, तसे सर्व कागदपत्रे ही त्यांनी जमा केली आहेत. हे रिसॉर्ट अजून सुरू झालं नाही. तरीही या रिसॉर्टमधून पाणी हे समुद्रात जात असल्याचा आरोप करत केंद्रीय पर्यावरण खात्याने तक्रार केली. त्याच तक्रारीवरुन ईडीची आजची कारवाई आहे. हे रिसॉर्ट सुरूच नाही तर कारवाई कशी केली जाते हा प्रश्न आहे.”
अनिल परब म्हणाले की, “ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिले आहेत. या आधीही उत्तरं दिली आहेत, आजही सर्व उत्तरं दिली आहेत. बंद असलेल्या रिसॉर्टचे पाणी समुद्रात जात आहे असा आरोप करुन कारवाई केली जात आहे. यावर आता मनी लॉड्रिंगचा मुद्दा येतोय कुठे? या संबंधी आपण न्यायालयात भूमिका मांडू.”
तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे पथक राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले आहे. त्या आधी एक तास वांद्रे येथील अनिल परब यांच्या निवासस्थानातून ईडीचे एक पथक बाहेर पडलं होतं. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी केली होती.