
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -श्री,रमेश राठोड आर्णी
यवतमाळ, दि 25 मे, जिमाका :- कुळ कायद्याने प्राप्त जमीनीचे भोगवटदार वर्ग रूपांतरीत करण्यासाठी जिल्ह्यात 25 मे पासून विशेष मोहीम राबविण्याचे आणि यासंबंधात गावकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसूल यंत्रणेला दिल्या आहेत.
कुळ कायद्याच्या जमीनींचे सत्ताप्रकार बदलण्यासंदर्भात मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियमाच्या कलम 57 मधील पोटकलम (1) मध्ये दाखल केलेल्या परंतूकानुसार, शेत जमीनीची तीच्या खरेदी किंवा विक्रीच्या दिनांकापासुन 10 वर्षाचा काळ लोटला असेल तर, अशा शेतजमीनीची विक्री करण्यापूर्वी विक्रेत्याने जमीन महसूल आकारणीच्या 40 पट इतकी नजराणा रक्कम शासनाला भरलेली असल्यास व अन्य शर्तीची पुर्तता करीत असल्यास ७/१२ वर असलेली नियंत्रीत सत्ता प्रकाराची नोंद कमी करुन सदर जमीनीचा धारणाधिकार वर्ग-२ हा भोगवटदार वर्ग १ करण्याचे मार्गदर्शन शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.
त्यानुसार जिल्ह्यात सदरची कार्यवाही मोहीम स्वरुपात करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत दिनांक 25 मे 2022 ते 3 जून 2022 या कालावधीत गावात दवंडी किंवा जाहीर सुचनेद्वारे प्रचार व प्रसार करून ग्रामस्थामध्ये जाणीव जागृती निर्माण निर्माण करणे व कुळाचे जमीनीबाबत जुने दस्त काढून यादी तयार करण्याचे काम पुर्ण करावयाचे आहे. दिनांक 3 ते 9 जून पर्यंत मंडळ अधिकारी / तलाठी हे वरील कुळ जमीन धारकाची यादी तहसिलदार यांना सादर करतील. 9 ते 16 जून या कालावधीत तहसिलदार यांचे आदेशानुसार संबधित गावांचा फेरफार नोंदविण्यात येवून सातबारा मधील भोगवटदार वर्ग 2 चे 1 करण्याबाबातचा अहवाल उपविभागीय कार्यालयास सादर करतील. दिनांक 16 व 17 जून रोजी तहसिलदार यांचे कडून प्राप्त अहवालानुसार उपविभागीय अधिकारी यांनी जिल्हा कार्यालयास अहवाल सादर करावयाचा आहे.
उपरोक्त कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व संबंधीतांनी मोहिमेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत.