
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
बुलडाणा: दि.२७.
आंबा या पिकाचे भारतातील लागवड क्षेत्र तसेच जिल्ह्यात लागवडीसाठी असलेला वाव यावर चर्चा करून आंबा एक उत्कृष्ट उत्पादन देणारे पीक असून याबाबतीत कृषी विज्ञान केंद्र तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्याशी संपर्क ठेवून चांगल्या पद्धतीने लागवड करावी. फळपिकांना आपले उत्पादन दुप्पट किंवा तिप्पट करण्यासाठी प्राथमिकता द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस.राममुर्ती यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्र, बुलडाणा येथे जिल्ह्यातील शेतकरी तसेच आंबा प्रेमींसाठी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. एस .जी. भराड, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. उज्वल राऊत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एन. एस. नाईक, डॉ. सी. पी. जायभाये, डॉ. सतीश जाधव, अनिल बोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी शेतकर्यांनी कृषि विभागाच्या विविध फळ पिक लागवड व व्यवस्थापन योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करून फळ पिक हेच भविष्यात शेतकर्यांच्या समृद्धीसाठी उपयोगी ठरतील असे नमूद केले कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. अनिल एस. तारू यांनी भव्य आंबा महोत्सव- प्रदर्शनी व विक्री या कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. यातून त्यांनी जिल्ह्यात आंबा लागवडीस शेतकर्यांचा वाढता कल लक्षात घेता शास्त्रीय पद्धतीने लागवड व्हावी, जिल्ह्यातील विविध आंबा जातींची माहिती शेतकर्यांना व्हावी आणि शास्त्रज्ञांना लागवड तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहचवता येण्यासाठी या आंबा महोत्सवाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने केल्याचे सांगितले आणि दरवर्षी अश्या महोत्सवाचे आयोजन नियोजन करणार असल्याचे नमूद केले.
याप्रसंगी प्रगतिशील आंबा उत्पादक शेतकरी अवचितराव पालकर आणि डॉ. नीता राजेश जतकर यांनी त्यांच्या आंबा बागेतील अनुभव उपस्थित शेतकर्यांना सांगितले. आंबा महोत्सवासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ५७ शेतकर्यांनी सहभाग नोंदवून आपल्या शेतातील विविध जातींच्या आंब्याचे प्रदर्शन करून आपल्या दालनातून सुधारित तसेच पारंपारिक जातींच्या आंब्यांची विक्री केली. संचालन डॉ. जगदीश वाडकर तर आभार प्रदर्शन प्रवीण देशपांडे यांनी केले. एकूण ६१ आंबा उत्पादक शेतकर्यांनी प्रदर्शनीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आणि २९ माहितीतील जातींचे आंबे विक्रीस ठेवले आणि महोत्सवास ५७ गावरान जातीच्या आंब्याची नोंद झाली. महोत्सवासाठी जिल्ह्यातून ३४७ शेतकर्यांनी व नागरिकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतले.