
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : जिद्द आणि महत्त्वकांक्षा असेल, मेहनत घ्यायची तयारी असेल तर एक शिपाईसुद्धा आपल्या स्वप्नांना पूर्ण करू शकतो. याचेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. या शिपायाचा प्रेरणादायी प्रवास सर्वांना अचंबित करत आहे. या अवलियाचे नाव आहे संभाजी वाघमारे. घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती असताना ४० वर्षांपूर्वी वाघमारे नोकरीच्या शोधार्थ पुण्यात आले. त्यांनी बाणेर भागात एक खोली भाड्याने घेतली. नंतर कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी नोकरीसाठी पुणे विद्यापीठात अर्ज केला. तिथे त्यांना शिपाई पदाची नोकरी प्राप्त झाली. तेथे नोकरी करता करता त्यांच्याच कार्यालयातील एका लिपीक मुलीशी आधी मैत्री, प्रेम आणि नंतर लग्नसुध्दा केले. तुम्ही एक साधे शिपाई असताना माझ्या सारख्या लिपीकेशी कसे लग्न केले? हा प्रश्न त्यांना जिव्हारी लागला. त्याक्षणी त्यांनी मनावर घेतले. नंतर नोकरी सांभाळून वाघमारेंनी खूप अभ्यास करून बीए पदवी मिळवली. त्यांना ज्यू. क्लार्क पदावर बढती मिळाली. नंतर यश मिळवीत वरिष्ठ लिपीक, ते उपकुलसचिव पदापर्यंत यशस्वी मजल मारली.