
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेचा निकाल बुधवार, दि. ८ जून रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९५.२५ टक्के लागला.विभागातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.५९ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.२१ टक्के आहे. यंदाच्या निकालातही मुलांपेक्षा मुलीच सरस ठरल्या आहेत.लातूर, उस्मानाबाद व नांदेड या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या लातूर विभागीय मंडळातून ९० हजार २२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेस ८८ हजार ८३० विद्यार्थ्यी प्रविष्ट झाले होते.
त्यापैकी ८४ हजार ६१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४९,९०५ मुले तर ३८,९२५ मुली परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४७,०१६ मुले तर ३७,५९९ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.२१ तर मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.५९ आहे. लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९५.२५ टक्के लागला आहे.
लातूर विभागीय मंडळात १२ वीच्या परीक्षेसाठी शाळा तिथे उपकेंद्र होते. विभागात मुळ केंद्र २१२ तर उपकेंद्र ६५३ असे एकूण ७६५ केंद्र होते. जिल्हाधिका-यांच्या नेतृत्वाखालील दक्षता पथकाने परीक्षेदरम्यान चांगली दक्षता घेतली. त्यामुळे परीक्षा सुरळीतपणे पार पडली होती.
परीक्षेदरम्यान केंद्रावर कॉपीचे २५ व इतर १३ असे एकूण ३८ गैरप्रकार घडले. या सर्वच प्रकरणात त्या त्या विषयाची संपादणूक रद्द करण्यात आली, अशी माहिती लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली.