
दैनिक चालू वार्ता आर्णी प्रतिनिधी-श्री. रमेश राठोड
दिनांक : ८ – देशभर विखुरलेल्या , डोंगर दऱ्यात राहणाऱ्या बंजारा, गोर बंजारा, लमाणी, लंबाडी, लंबाडा आदि नावाने ओळखल्या जाणाऱ्या, आपली आगळी वेगळी संस्कृती जपणाऱ्या या समाजाच्या जाती आणि संस्कृतीवर जातीच्या नावाचे साधर्म्य असलेलेल्या वंजारी समाजाच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे या मागील कांही वर्षापासून बंजारा समाजाच्या महिला पोशाखाचा, मानचिन्हाचा (कवल पट्टा) राजकीय पोळी भाजण्यासाठी सर्रास वापर करीत असून पंकजा मुंडे यांच्या या कृतीला बंजारा समाज तीव्र आक्षेप नोंदवत आहे.
बंजारा आणि वंजारी या दोन भिन्न संस्कृती असलेल्या जाती आहेत. या दोन जातींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. दोन्ही जातीचा पोशाख, वेशभूषा , केशभूषा, खानपान, उपासना पद्धत, सण – त्यौहार, गोत्र, आडनाव , रुढी-परंपरा सर्व काही भिन्न असतांना मुंडे या वारंवार त्यांच्या कार्यक्रमात बंजारा पोशाखाचा , सन्मानचिन्हाचा/कवल पट्टयाचा दुरुपयोग करुन त्याची अप्रतिष्ठा करीत आहेत. दोन जाती गुण्या गोविंदाने नांदत असतांना त्यामध्ये तेढ निर्माण होईल असा व्यवहार पंकजा मुंडे करीत असून त्यांनी तो ताबडतोब थांबवावा असे त्यांना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना बंजारा समाजाकडून सांगण्यात आलेले आहे.
नुकतेच त्यांनी गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बंजारा स्त्रियांना बंजारा वेशभुषेत व्यासपीठावर उभे करुन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे स्वागत करायला लावले. कळस म्हणजे बंजारा समाजाचे मानाचे चिन्ह
( कवल पट्टा ) मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. वास्तविक पाहता हे मानचिन्ह फक्त बंजारा समाजच अन्य मान्यवरांचा सन्मान करतांना त्याचा वापर करु शकतो किंवा बंजारा समाजाच्या विविध प्रसंगी वापरले जाते. ते इतर जातींना त्याचा वापर करण्याचा अधिकार नाही. तरीही पंकजा मुंडे या बंजारा सांस्कृतिक चिन्हाचा वापर करुन स्वत:ला बंजारा असल्याचे सिद्ध करतांना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर उत्तर भारतात वंजारी समाजाचे कार्यकर्ते आपण बंजारा आहोत, वंजारी बंजारा एकच जात असल्याचा खोडसाळ प्रचार करीत आहेत.
भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बंजारा समाजाच्या भावनेची गंभीर दखल घेऊन राजकीय स्वार्थासाठी बंजारेत्तर समाजाच्या कोणत्याही नेत्यांनी मानचिन्हाचा वापर करु नये. तसेच त्यांच्या कार्यक्रमात बंजारा समाजाच्या माता भगिनींना बंजारा पोषाखात उभे करुन देशभर विखुरलेल्या बंजारा समाजाच्या गैरफायदा कोणीही घेऊ नये. हे प्रकार थांबले नाही तर बंजारा समाजाला भाजपाविरुद्ध देशभर प्रचार करावा लागेल. म्हणून भाजपा पक्ष श्रेष्ठीने पंकजा मुंडे यांना आवर घालून त्या ज्या प्रकारे वारंवार बंजारा जातीवर आणि संस्कृतीवर अतिक्रमण करीत आहेत ते तात्काळ थांबवण्यात यावे. असे बंजारा समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिद्धि पत्रकात म्हटलेले आहे.