
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या धोरणाच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसाला हक्काचे पाणी मिळणार आहे. सर्वांसाठी पाणी हे धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका देशात पहिली महानगरपालिका आहे.
सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान, नागरी निवारा परिषद गोरेगांव येथे बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरातील सर्व निवासी रहिवाशांसाठी असणाऱ्या “सर्वांसाठी पाणी” धोरणाचा शुभारंभ शनिवारी (दि.7) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या वेळी “सर्वांसाठी पाणी !” धोरणाच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पर्यावरणाची कमीत कमी हानी करून विकास कामे करावयाची आहेत. महानगरपालिकेची बेस्ट सेवा ही मुंबईची रक्तवाहिनी आहे. मुंबई महानगरपालिकेकडून वाहतूक,पाणी, आरोग्य सुविधा, महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा वाढविण्याच्या होत असलेल्या कामाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
सर्वांसाठी पाणी धोरणाची उद्दिष्ट्ये
खासगी जमिनीवरील अघोषित झोपडपट्टीधारकांना पाणीपुरवठा करणे. तटीय नियमन क्षेत्रातील (सीआरझेड) झोपडपट्टी धारकांना सार्वजनिक नळ खांबाद्वारे पाणीपुरवठा करणे. क्षमापित निवासी इमारतींमधील अनधिकृत वाढीव बांधकामांना नळ जोडणी देणे. प्रकल्पबाधित झोपडपट्टी धारकांना पाणीपुरवठा करणे. निवासी इमारती किंवा त्यांचा काही भाग ज्याचे नकाशे मंजूर नाहीत, परंतु बांधकाम प्रारंभ पत्राशिवाय झाले आहे, त्यांना नळ जोडणी देणे ही या धोरणाची उद्दिष्टे आहेत.