
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
घडलेल्या घटनेला वीज वितरण कंपनी दोषी – अरुण शेवाणे
अमरावती :- अंजनगाव तालुक्यातील पोही शिवारात बैलगाडीला जुंपलेल्या बैलाची शेपटी वीज खांबाच्या वीज प्रवाह असलेल्या अर्थींग तारेला लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.दि.१६ जुलै २०२२ ला दुपारी ०३:३० वा. च्या सुमारास ही घटना घडली.कापुसतळणी येथील कमलकिशोर लढ्ढा यांच्या मालकीची ही बैलजोडी दिवसभर शेतात काम करून घरी जातांना शिव रस्त्याला लागून वीज खांबाच्या अर्थींग ताराला बैलाची शेपटी अडकली असता जागेवरच बैल खाली कोसळला.लगेच बैलगाडी हाकणाऱ्याने बैलगाडीचे जू हाती धरून खाली उतरला व लगेच बैलाला सोडविले आणि बैलगाडी बाजूला केली असता तोपर्यंत बैल मरण पावलेला दिसला.बैलावर बारकाईने नजर टाकली असता बैलाच्या शेपटीतून धुर निघत होते.वीज खांबाच्या अर्थींग तारामध्ये वीज प्रवाह सुरू असल्याचे श्री.लढ्ढा यांच्या लक्षात आले.लगेच लढ्ढा यांनी गावातील प्रसिद्ध पक्षीमित्र तसेच समाज कार्यकर्ते अरुण शेवाणे यांना फोन करून सदर घडलेल्या घटनेची माहिती दिली.लगेच समाज कार्यकर्ते अरुण शेवाणे यांनी वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री.राठोड यांना फोनवर घटनेची माहिती देऊन त्वरित वीज प्रवाह बंद करण्यास सांगितले व सदर घटनेची माहिती अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनला सुद्धा दिली.
माहितीसूत्रानुसार,घटनास्थळी वीज वितरण कंपनीचे अभियंता श्री.राठोड आले असता समाज कार्यकर्ते श्री.शेवाणे यांनी म्हटले की,सदर बैल ५० हजार रुपये किंमतीचा असून घडलेल्या घटनेचा पंचनामा करून त्याची त्वरित नुकसान भरपाई मिळण्यात यावी.तसेच तालुक्यातील संपूर्ण वीज खांबाच्या तारची पाहणी करून नादुरुस्त तारची विनाविलंब दुरुस्ती करण्यात यावी तसेच वीज खांब व अर्थींग ताराच्या जवळील झाडं झुडपांच्या फांद्यांची छाटणी करावी जेणेकरून भविष्यात जीवित हानी होणार नाही,जर का यानंतर अशी घटना घडल्यास संबंधित कर्मचारी व आपणांस जबाबदार धरल्या जाईल असे यावेळी श्री.शेवाणे यांनी घटनास्थळी अभियंता श्री.राठोड यांना सांगितले.