
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये दोघे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. महत्वाची बाब म्हणजे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चेसाठी एकत्र येण्यासाठी भाजप नेत्यांनीच मध्यस्ती केल्याचेही सांगत दिपाली सय्यद यांनी भाजप नेत्यांचेही आभार मानले आहे
दिपाली सय्यद यांचं दुसरं ट्विट
दिपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, ‘येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल,’ असं ट्वीट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे.
.
दिपाली सय्यद यांचं पहिलं ट्विट
त्याआधीही शनिवारी (१६ जुलै) दिपाली सय्यद यांनी आणखी एक ट्वीट करत मोठे संकेत दिले होते. ‘लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील’. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहीलं आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यावं ही सर्वांची इच्छा
या संदर्भात आज पत्रकार परिषदेतही त्यांनी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाने एकत्र येण्यावर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला, असा सवाल विचारला असता दिपाली सय्यद म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला हे मला माहित नाही. पण, महत्वाचं हेच आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. शिवसेना एक व्हावी, ही सर्व आमदारांचीच इच्छा आहे.