
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : शिंदे गटाच्या बंडाळीमुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अजित पवारांना विधानसभेचं विरोधी पक्षनेते पद मिळालं.
तर विधापरिषदेचे विरोधी पक्षनेते पद शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांना मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याचदरम्यान, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचा नेता व्हावा , अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. नाना पटोले म्हणाले, ‘राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या आमदारांना बोलावलं आहे. त्या संदर्भात आम्ही बैठक घेत आहोत. विधानपरिषद व विधीमंडळात आमदार विश्वासदर्शक ठरावाला अनुपस्थित होते, याची दखल दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. त्यानुसार दिल्लीतील वरिष्ठ नेते यावर योग्य तो निर्णय घेतील’. दरम्यान, विधानपरिषदेत आमचा विरोधी नेता व्हावा, प्रमुख मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
‘प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यावर मला काही भाष्य करायचं नाही. देशात मोदी सरकार आल्यापासून विरोधकांना दोषी शत्रू ठरवलं जात आहे. यावर राजस्थानच्या मुख्य न्यायमूर्तींचे मत महत्वाचं आहे. न्यायव्यवस्था ही महत्वपूर्ण व्यवस्था असून त्याचे मत लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाचे आहे. महाराष्ट्रात एका पक्षाला एक तर दुसऱ्या पक्षाला वेगळं न्याय मिळतो ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. राज्यपाल दुटप्पीपणा करत आहेत.
नव्या सरकारने मागच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देणं म्हणजे सूड बुद्धीने हे होत आहे. वेळ पडल्यास महाविकास आघाडी बैठक घेऊन उद्धव ठाकरे आणि पवार यांच्याशी चर्चा करून राज्यपाल यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊ, वेळ पडल्यास न्यायालयातही जाऊ. कारण अशा प्रकारे निर्णय मागे घेऊन जनतेचं नुकसान होत आहे’, असे नाना पटोले म्हणाले. दीपाली सय्यदवर भाष्य करताना पटोले म्हणाले, तो शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, त्यावरआम्ही बोलणं योग्य नाही’.