
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -शाम पुणेकर
पुणे: कोरोनाची लाट ओसरल्यानंतर सीओईपी येथील महापालिकेचे जम्बो हॉस्पिटल बंद करण्यात आले. सध्या येथील रुग्णालयाचे स्ट्रक्चर काढण्यात आले असून, मैदानात ठिकठिकाणी राडारोडा आणि कचरा पडल्याची बाब निदर्शनास आली आहे.
याबाबत संबंधित संस्थेला महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पत्र देण्यात आले आहे. महापालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी १९ जुलै रोजी संध्याकाळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मैदानाची पाहणी केली. त्या वेळी मैदानात राडारोडा आणि कचरा पडल्याचे निदर्शनास आले.
याशिवाय, मैदानाच्या एका भागात जम्बो रुग्णालयातील कमोड ठेवण्यात आले असून, तेथील डबक्यांमध्ये डासांची पैदास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मैदानातील पेव्हर ब्लॉक अद्याप काढण्यात आलेले नाहीत. मैदानातील राडारोडा त्वरित उचलावा, कमोडची योग्य विल्हेवाट लावावी, पेव्हर ब्लॉक काढावेत, तसेच ‘लॉस्ट अँड फाउंड’ ची योग्य कार्यवाही करून त्या दळवी हॉस्पीटल मध्ये हलवाव्यात अशा प्रशासनाच्या सूचना आहेत, तरीही कार्यवाही केली नाही. प्रशासन निष्क्रिय झाले आहे.