
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अंध आई- वडिलांना कावडीत बसवून तिर्थयात्रेला नेणाऱ्या श्रावण बाळाची कथा आपण अगदी लहान असल्यापासून ऐकत आलो आहाेत. तो श्रावण बाळ कसा होता आणि तो आई- वडिलांना नेमकी कशी यात्रा घडवून आणत होता, हे आपण केवळ ऐकलेलं आहे..
पण आजचा आधुनिक श्रावण बाळ कसा असू शकतो किंवा कसा आहे, हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघण्याचा अनुभव सध्या उत्तर प्रदेशातली जनता घेत आहे. हा आजच्या युगातला श्रावण बाळ सध्या चांगलाच लोकप्रिय झाला असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेशातल्या कावड यात्रेला नुकतीच सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात आणि काही हिंदी भाषिक राज्यांमध्ये या यात्रेला कांवर यात्रा असंही म्हणतात. कावड म्हणजेच खांद्यावर एक काठी आडवी ठेवलेली आणि त्या काठीच्या दोन्ही बाजूंना वस्तू ठेवण्यासाठी किंवा बसण्यासाठी असलेली जागा. साधारणपणे एखाद्या तराजूसारखा त्याचा आकार असतो. तर या कावडीतून गंगाजल आणायचे आणि त्याने महादेवाला अभिषेक करायचा, असं या कावड यात्रेचं स्वरुप असतं. ही यात्रा सुरु झाली की उत्तरेतले अनेक भाविक या यात्रेत सहभागी होतात. दूरदुरून येऊन महादेवाला अभिषेक करतात. याच यात्रेत सहभागी झाला आहे एक आधुनिक श्रावणबाळ.
या यात्रेत जे इतर लोक सहभागी झालेले आहेत, त्यांच्या कावडीला दोन्ही बाजूंनी पाण्याचे हंडे किंवा पाण्याचे भांडे ठेवलेले आहेत. पण या गृहस्थाच्या कावडीत एका बाजुला त्याची वृद्ध आई तर दुसऱ्या बाजुला त्याचे थकलेले वडील बसलेले आहेत. कावड यात्रेत सहभागी होण्याची आई- वडिलांची खूप इच्छा होती. पण ते दोघेही वयोमानाने थकलेले असल्याने त्यांना एवढा मोठा प्रवास झेपणार म्हणून या त्यांच्या लेकाने पुढाकार घेतला आणि कावडीत बसवून दोघांनाही यात्रा घडवून आणण्यास तो निघाला आहे. त्यांचा हा व्हिडिओ अशोक कुमार या आयपीएस अधिकाऱ्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. आज थकलेले आईवडील अनेक तरुणांना घरात नको आहेत, त्यांना घरातून हकलून दिले जाते. तिथे हा श्रावणबाळ आई- वडिलांना अशा पद्धतीने यात्रा घडवून आणत आहे, त्याला माझं नमन.. अशा शब्दांत त्यांनी या आजच्या श्रावणबाळाचं भरभरून कौतूक केलं आहे.