
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
मार्च-एप्रिल-मे महिन्यातला असह्य उकाडा घालवायचा असेल, भूगर्भांतरचा ओलावा कायम राहावा असे वाटत असेल, अधिकाधिक ऑक्सिजन मिळवायचा असेल, सतत व कायम सावली हवी असेल, पर्यायाने पर्जन्यवृष्टी अधिक प्रमाणात व्हावी असं वाटतं असेल तर झाडांची लागवड व निर्मिती करणे अत्यंत गरजेचे आहे. किंबहुना त्यासाठीच परभणी जिल्हा परिषदेने सुध्दा शासनाच्या मदतीने अभिनव असा संकल्प सोडला आहे. आगामी काळात ५० लाख झाडे लावून अधिकाधिक हिरवळ कशी निर्माण करता येईल यावरच कटाक्ष ठेवला जाईल परंतु त्यासाठी जनतेचा ही मोठ्या प्रमाणात सहभाग आवश्यक असल्याचे आवाहन परभणी जिल्हा परिषदेचे सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे.
नुकताच इंद्रायणी माळावर वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी शिवानंद टाकसाळे यांनी उपस्थितांसमोर समस्त नागरिकांना मौलिक मार्गदर्शन केले. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या पंक्तीला आधार घेत उन्हाळ्यातला असह्य उकाडा, परिणामी अन्यत्र स्थलांतर करणे भाग पडते. त्यांचं झाडांचा आसरा घेऊन वास्तव्य करणाऱ्या पशु,पक्षी, जनावरे, किडे, मुंग्या, प्राणी यांनाही याच झाडांविना विस्थापित व्हावे लागते. भूगर्भातील पाण्याची पातळी व ओलावा कमी कमी होणे, पर्यायाने विहिरी, बोअर मधील पाणी कमी प्रमाणात मिळते, झाडे नसल्याने ऑक्सिजन न मिळणे या व अशा अनेक समस्या झाडे तोडणे नव्हे त्यांची कत्तल करणे म्हणजेच -हास करणे होय.
त्यासाठीच आम्ही शासनाच्या मदतीने सुमारे ५० लाख झाडे लावण्याचा जो संकल्प हाती घेतला आहे तो निव्वळ गावागावातून न राबविता घरांच्या सभोवताली, गल्ली-बोळ, रस्ते, महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी, मोकळ्या जागा इतकेच नाही तर शेतीमध्ये, बांधावर, टेकड्यांवर सुध्दा अशी झाडे लावून ही मोहीम, चळवळ म्हणूनच अंमलात आणली पाहिजे. वनचरेची ही वृक्षवल्ली आपले सोयरे असल्यागत सांभाळून त्यांची जोपासना करणे आवश्यक असल्याचे आवाहनही जि.प. सीईओ टाकसाळे यांनी केले.