
दैनिक चालु वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : तिरुपती-तिरुमला हे मंदीर हिंदूंचे आहे तर छत्रपती शिवराय हे सुद्धा हिंदूंचे राजा आहेत असे प्रतिपादन परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी तिरुपती-तिरुमल्ला येथे केले.
तिरुमल्ला देवस्थान परिसरात निवडणूक आयोगाचे संचालक धर्मराज रेड्डी द्वारा भागवत कथा समारोहाचे समापन झाले. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना खा. संजय जाधव, मंदीर देवस्थानचे कार्यकारी संचालक संतोष अजमेरा, मंदीरातील स्वामी महाराज, शिवसेनेचे परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम, गोविंदशेठ अजमेरा, श्यामशेठ अजमेरा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवराय यांची प्रतिकृती देव दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांमध्ये ठेवली असता त्यावर चेकिंग पोस्ट स्थानी सुरक्षा रक्षकांनी हरकत घेतल्याचा जो कथित प्रकार घडला होता, ती एक अफवा असल्याचे व तसे कृत्य कोणीही करणार असे ठाम आश्वासन उपस्थित पदाधिकारी यांनी यावेळी दिले. तोच धागा पकडून का. जाधव यांनी पण “मंदीर हिंदूंचे आहे तर छत्रपती शिवराय सुध्दा समस्त हिंदूंचे राजा आहेत असे सांगितले. ते पुढे असेही म्हणाले की, देवस्थान स्थळी कोणत्याही राजकीय पक्षांचे झेंडे चालणार नाहीत परंतु निस्सीम भक्ती असलेले छत्रपती शिवराय, बजरंग बली यांच्या प्रतिकृतीला कोणीही विरोध करु शकणार नाहीत. छत्रपती शिवरायांना मी सुध्दा मानतो नव्हे आज मी जो काही आहे, तो त्यांच्याच आशीर्वादाने आहे हे नाकारता येणार नाही असे ठणकावले. त्यानी पुढे असेही सांगितले की, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता केवळ महाराष्ट्रच नाही तर संबंध देशातून येणाऱ्या भाविक भक्तांनी मंदीर ट्रस्टीला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पूर्णपणें सहकार्य केले पाहिजे. इतकेच नाही तर ज्या कोणा हिंदू बांधवांना या ठिकाणी उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा आहे, ते सुद्धा येथे करु शकतील. त्यासाठी मंदीर व्यवस्थेकडून पूर्ण सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले आहे. तथापि केवळ शिवरायांचं नाही तर कोणत्याही हिंदू देवतांविषयी आणि मंदीराविषयी कोणीही गैरसमज पसरवू नये किंवा तसा कोणताही चुकीचा प्रयत्न करु नये असेही का. जाधव यांनी याप्रसंगी ठणकावले.
मागील काही दिवसांपासून ज्या प्रकरणाविषयी तिरुपती -तिरुमला देवस्थानच्या सुरक्षा पथक आणि व्यवस्थापकीय संचालकांविषयी जो कथित गैरसमज निर्माण झाला होता, त्यावर आता पूर्णपणे पडदा पडला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेमुळे जो विचार विमर्श झाला तो सार्थकी ठरल्यामुळे आता भक्तांना मनमोकळे तिरुपतीच्या बालाजी दर्शनासाठी कांहीच अडचण नसणार आहे.