
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:-तालुक्यात बाळकापरा येथे रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पीकअप जीप आणि ईको कार या दोन चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन ईको वाहनातील चालकाचा दुर्दैवी अंत झाला.काही दिवसापूर्वीच वळवंडा येथे अश्याच अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.ही घटना ताजी असतानाच बाळकापरा समोर ही दुर्दैवी घटना घडली.मृत्य चालक प्रकाश यशवंत खोटरा वय-३६,रा-बाळकापरा हे आपले वाहन क्रमांक एमएच०४ एफआर ३६४३ जव्हारच्या दिशेने जात असताना बाळकापरा गावा समोरच असलेल्या डांबर प्लांट समोर जव्हार कडून डहाणूकडे जाणारी पीकअप जीप क्रमांक एमएच४८ एवाय ५६९४ आणि ईको कार या दोन वाहनाची जोरदार धडक झाली.ही धडक इतकी भीषण होती की ईको चालक गंभीररीत्या जखमी होऊन त्यांना तात्काळ जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.मात्र दाखल करताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घडलेल्या गंभीर घटनेने खोटरा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार असून मृत्य प्रकाश हेच घरातील करती-कमावती व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबीयासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.