
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- शाम पुणेकर
पुणे :केशवनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते मांजरी रस्त्यापर्यंत व डावीकडील रेणुकामाता मंदिरापर्यंतच्या हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृत फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने जेथे मोकळी जागा दिसेल तेथे फ्लेक्स उभारले जात आहेत. महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेनेच आता केशवनगरचे नामांतर रितसर “फ्लेक्सनगर’, असे करावे अशी चर्चा नागरिकांमध्ये होऊ लागली आहे.
केशवनगर परिसरातचे फ्लेक्समुळे विद्रुपीकरण झाले आहे. सार्वजनिक रस्त्यावर, नाक्यावर शुल्लक कारणांसाठी मोठमोठे फ्लेक्स उभारले जात आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. केशवनगर भागात “स्वयंभू’ पुढाऱ्यांची संख्या वाढली आहे. आमचे दादा, युवकांचे आशास्थान…, असे फ्लेक्स , हॉटेलचे उदघाटन, वाढदिवस, पक्षप्रवेश, निवड, शुभेच्छा यासाठी फ्लेक्स लावले जात आहेत. एकाने फ्लेक्स लावला की त्याच्यापेक्षा मोठा फ्लेक्स लावण्याची स्पर्धा या भागात सुरू आहे. यासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत.