
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी- मोहन आखाडे
शिऊर येथे वारकरी संप्रदायाचे केंद्रबिंदू असलेल्या श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या २७७ व्या अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने शिऊर गावात जनसागर लोटला आहे, हा ऐतिहासिक सोहळा आपल्या डोळ्यात साठवून घेण्यासाठी राज्यभरातुन भाविक शिऊर येथे येत आहे.
ज्ञानदानासोबतच अन्नदानाचा विशेष लौकिक असलेल्या श्री संत शंकरस्वामी महाराज यांच्या २७७ वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह स्वामींच्याच समाधी प्रांगणात होत आहे, सोबतच मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून या अखंड हरिनाम सप्ताहाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातील नामवंत कीर्तन प्रवचनकारांचे कार्यक्रम होत असून दिनांक ९ रोजी संस्थानचे उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे. तब्बल १११११ किलो साखरेपासून महाप्रसाद तयार केला जात असून २४ तास महाप्रसाद तयार करण्याचे काम सुरू सोबतच
ज्ञानदान व अन्नदानाचा जागर सुरू आहे
सप्ताह प्रसंगी गावातील परिसरातील सर्वधर्मीय समाजबांधव हजेरी लावत असून असंख्य भाविक शिस्तीत महाप्रसाद घेत आहे, सप्ताहातील गर्दी डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली असून अबालवृद्ध पासून ते वृद्धापर्यंत सर्वांनी हिरारीने सहभाग घेत भोजन वितरणासाठी पुढाकार घेतला महिलांची,महाविद्यालयीन तरुणींची उपस्थिती लक्षणीय दिसायला मिळाली एकाच वेळी तब्बल १० हजारहून अधिक भाविकांनी सोबतच रांगेत,शिस्तीत भोजन केले कार्यक्रमासाठी दैंनदिन रूपरेषेत अनेक मान्यवर भेट देत असून सप्ताहाचे सुंदर नियोजनाचे कौतुक करत आहेत महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांच्या सुमधुर वाणीला श्रवण करण्यासाठी श्रोत्यांची मांदियाळी बघायला मिळत आहे शिऊर परिसर हरीनामाने दंग झाले असून सप्ताह मंडपात प्रवेश केल्यानंतर स्वर्गीय आनंदाची अनुभूती झाल्याची भावना भाविक व्यक्त करत आहेत.
सर्व मानवी मूल्ये प्राप्त होण्यासाठी अखंड हरीनाम सप्ताह उत्तम माध्यम बंडोपंत लाखेस्वामी शिउरकर
असून महाराष्ट्रात वारकरी सांप्रदाय फार मोठा आहे . या सांप्रदायामुळेच महाराष्ट्रात सामाजिक स्थिरता मानसिक स्वास्थ व सामाजिक सदभाव टिकून असल्याचे प्रतिपादन श्री संत शंकरस्वामी महाराजांचे वंशज ह. भ.प बंडोपंत लाखेस्वामी यांनी केले.
शिऊर येथे सुरू असलेल्या श्री संत शंकरस्वामी महाराज अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दि ६ रोजी त्यांचे प्रवचन झाले यावेळी ते बोलत होते,
महाराष्ट्र राज्याला संत महात्म्ये , अखंड हरीनाम सप्ताहाची व वारीची फार मोठी परंपरा लाभलेली आहे, अखंड हरीनाम सप्ताह म्हणजे महाराष्ट्राला मिळालेली अनमोल देन होय, ही परंपरा २७७ वर्षापासून चालत आलेली आहे. स्वामींच्या सप्ताहाचा राज्यात लौकिक असून येथील अन्नदान विशेष असल्याचे बंडोपंत महाराज म्हणाले.
या हरीनाम सप्ताहमुळे जनतेच्या मनात,आचरणात,विचारात,संयम,शांतता,सामज्यसता,धर्मभावना,सहकार्य,सदभाव,सद्वविचार,सत्संग, सांस्कृतिक मुल्ये, नैतिक मुल्ये जोपासण्यासाठी मंगल देणगी मिळते. संताची शिकवण आचरण्यात आणण्यासाठी प्रोत्साहन मिळते . या माध्यमातून ज्ञानामृताचा लाभ होतो त्यातून भक्तीचा अंकुर फुटून मानवी जीवनाची कृतार्थता साध्य होते. समाजात मान मान्यता त्या मुळेच टिकून आहे,हा सप्ताह म्हणजे अद्भुत आनंद सोहळा होय,या सप्ताहाचे आयोजनात सर्व जाती धर्म पंथ व समुदायांचा हातभार लागतो या भव्य व दिव्य कार्यात समाजातील सर्व नागरिक सहभागी होत असल्याने सामाजिक विषमता कमी होण्यास मदत होत असल्याचे बंडोपंत महाराज लाखेस्वामी म्हणाले.