
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-
स्वराज्याचा लढा हा स्वातंत्र्यासाठी, स्वाभिमानासाठी आणि रयतेच्या न्यायासाठीचा होता. मुगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही, इमादशाही अशा जुलमी, मजबूत व प्रस्थापित सत्ता चोहोबाजूंनी वेढलेल्या असताना काळोखाच्या पोटात स्वराज्याचा सूर्य उजाडला. शिवरायांच्या नेतृत्वाखाली मूठभर मावळ्यांनी केलेला पराक्रम देशाच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवर अन्यायाविरुद्ध लढणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. ज्या दऱ्याखोऱ्यांतून अत्याधुनिक साधने असतानाही वावरताना आपल्या मनात भीतीचे काहूर माजते ती दरी-खोरी मावळ्यांनी पायी पिंजून काढत अवघा मुलूख एक केला. वर्ण-जातीच्या काटेरी वाटा अठरापगड जातींना एकत्र करुन प्रशस्त करण्यात आल्या. अनेक मावळ्यांचे घाम अन रक्त गाळून स्वराज्य उभे राहिले. स्वराज्याचा मार्ग अनेक मावळ्यांच्या व कुटूंबांच्या त्याग व बलिदानाने पावन झाला. मराठे लढले ते केवळ सैन्य अन शस्त्र बळावर नाही. तर ते युक्तीच्या, एकीच्या बळाने लढले. एकीकडे बलाढ्य साम्राज्य असतानाही दुसऱ्या बाजूला मोजकी साधने घेवून ही ध्येयवेडी माणसे लढली व जिंकलीसुद्धा!
भारतीय स्वातंत्र्याचा लढाही असाच इथल्या सामान्य माणसांच्या त्याग, बलिदान अन शौर्याने यशस्वी झालेला आहे. स्वातंत्र्य मिळवताना जे कष्ट सोसावे लागतात त्याहून कैक पटीने अधिक कष्ट मिळवलेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी घ्यावे लागते हे जेव्हा स्वातंत्र्यानंतर जन्मलेली पिढी विसरते तेव्हा गुलामीची नवी सुरुवात होते. स्वातंत्र्याचे अत्युच्च क्षण भोगत असताना गाफीलतेने गुलामीच्या खाईत ढकलले जाण्याची अटळताही असते.
भारताचे स्वातंत्र्य आता जूने झाले. त्या स्वातंत्र्याचा जल्लोष करीत असताना आमचे पाय नव्या गुलामीच्या दलदलीत रुतले आहेत अन त्यातून बाहेर निघणे ही आपली जबाबदारी आहे याचे भानही असणे आवश्यक आहे.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना सार्वजनिक मालमत्तेचे झपाट्याने होत असलेले खाजगिकरण, वाढती महागाई व बेरोजगारी, नैसर्गिक संपत्तीची भांडवलदारांच्या नफ्यासाठी होत असलेली लूट, सत्ता व संपत्तीतील अधिकारांपासून वंचित राहत असलेली बहुसंख्य जनता या समस्यांचा व त्यावरील उपायांचा बोध करुन घेतला पाहिजे.
स्वराज्यापूर्वी मुगलशाही, निजामशाही, आदिलशाही होती त्याप्रमाणेच आज लूटारु राजकीय पक्ष कार्यरत आहेत. उमेदवारी मिळवण्यापासून ते निवडणूक जिंकण्यापर्यंत सर्वकाही पैशाच्या जोरावर चालत आहे.
राजकीय पक्षांच्या या बलाढ्य यंत्रणेपूढे सामान्य माणूस किरकोळ ठरत आहे. सामान्य माणसांच्या निष्पक्ष व लढाऊ संघटना उरल्या नाहीत. चळवळी मोडकळीस आल्या आहेत.
अशा परिस्थितीत स्वराज्याचा अन भारतीय स्वातंत्र्याचा केवळ पोकळ अभिमान बाळगून भागणार आहे काय? वर्तमानकाळात पायात रुतलेला गुलामीचा काटा न काढता भूतकाळातल्या स्वातंत्र्याच्या खोट्या समाधानावर दिवस काढणे याला जगणे म्हणता येईल काय?
कष्टकऱ्यांच्या पोरांची निर्भीड संघटनं गावोगाव उभी राहिली पाहिजेत. चिरीमिरीसाठी प्रस्थापित पक्षांच्या वळचलीना पडणाऱ्या पोरांना सोडून द्या. पण ज्यांच्याकडे किमान स्वाभिमान आहे, स्वत:च्या बळावर चार पैसे कमवायचा वकुब आहे अशांनी एकत्र आले पाहिजे. लोकप्रतिनिधींना डोक्यावर बसवून न घेता त्यांच्याकडून जनहीताची कामं करुन घेतली पाहिजेत. राज्यातल्या, केंद्रातल्या सरकाराने घेतलेल्या जनविरोधी धोरणांना वापस फिरवण्यासाठी दबाव टाकण्याएवढी ताकत जन आंदोलनांनी निर्माण केली पाहिजे.
स्वराज्याची, स्वातंत्र्याच्या लढ्याची प्रेरणा घेवून काही कृतीत उतरवण्याची हीच खरी वेळ आहे. नुसत्या घोषणा, पोकळ अभिमान याने काहीही साध्य होणार नाही. शिवरायांची स्वराज्यासाठीची सेना असो अथवा क्रांतिसिंह नाना पाटलांची स्वातंत्र्यासाठीची तुफान सेना असो, त्या धर्तीवरच्या जनतेच्या सेना आता निर्माण व्हायला हव्यात. बाकी सत्तेसाठीच्या सेना आपापसात भांडून चिखलफेक करताना आपण पाहतच आहोत. खऱ्या स्वातंत्र्यासाठी आता हे व्हायला हवे. स्वराज्याचे अन तुफान सेनेचे सेनापती घराघरातून पुढे यायला हवेत.
ॲड. शीतल शामराव चव्हाण
( मो. 9921657346 )