
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:दहा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या नगरपरिषदेतील सफाई कामगारांना अद्याप सेवा उत्पादन राशी व सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळाली नाही. सेवानिवृत्त कामगारांच्या आर्थिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी भिमशक्ती ही सामाजिक संघटना १७ ऑगस्ट रोजी नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करणार आहे. शासकीय, निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन नियमाप्रमाणे सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवा उत्पादन राशी देणे बंधनकारक असते. परंतु देगलूर नगरपरिषद कार्यालयाकडून दहा वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या रामचंद्र कांबळे, गंगाधर वाघमारे, दत्तू कांबळे, मारोती वाघमारे, विठ्ठलराव गायकवाड, खंडू वाघमारे, किशन बिरकंगन व अन्य २५ सफाई कामगारांना नगर परिषदेने अध्याप सेवा उत्पादन राशी आणि सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम दिलेले नाही. दरम्यान सेवानिवृत्त झालेले एक सफाई कामगार तुकाराम ढवळे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना केवळ १० टक्के उत्पादन राशी देण्यात आली. परंतु सदर राशी बँकेतून उचलण्यासाठी कुटूबियांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. याउलट २०१८ ते २०२२ या कालावधीमध्ये कार्यालयीन कर्मचारी हनमंतराव देशमुख, गोविंदवार, इमदाद अली, हनुमंत फिटर लक्ष्मण आनलदास यांना ९० टक्के सेवा उत्पादन राशी देण्यात आली आहे. ज्यांच्या परिश्रमामुळे देगलूर नगरपरिषदेला सलग चारवेळा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्या कामगारावर नगर परिषदेकडून अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडून कामगारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी भीमशक्ती ही सामाजिक संघटना पुढे सरसावली असून या संघटनेच्यावतीने १७ ऑगस्ट रोजी नगरपरिषद कार्यालयासमोर
तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचे भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे, मिलिंद बिरकंगन, संजीव सोनकांबळे, किशोर आडेकर, गंगाधर वाघमारे, विठ्ठलराव गायकवाड, खंडू वाघमारे, मारोती वाघमारे, दत्तू कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन उपजिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या मंत्र्यांना व जबाबदार अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.