
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. मार्मिकच्या ६२व्या वर्धानपणदिनाच्या कार्यक्रमात उद्धव यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला.
त्यानंतर शिवसेनेने सामना काढला, असंही उद्धव यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी शिवसेना संपविणे अशक्य असल्याच म्हटलं.
उद्धव म्हणाले की, काही जणांना वाटतं की, शिवसेना म्हणजे उंबऱ्यावर पडलेली वस्तू आहे. शिवसेनेची पाळमुळं ६२ वर्षांची आहे. मार्मिकचा जन्म झाला ते वर्ष १९६० आहे. मार्मिकने व्यंगचित्रकार काय करू शकतो, हे दाखवून दिलं. महाराष्ट्राने मुंबई मिळवली. मात्र मराठी लोकांवर अन्याय होतच होते. मार्मिकने व्यंगचित्रातून त्या अन्यायाला वाचा फोडली. शिवसेनाप्रमुखांनी व्यंगचित्र काढली. शिवाय शिवसेनाही काढल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे पुढं म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की देशातील सर्व पक्ष संपून जात आहे. हे वक्तव्य लोकशाहीला घातक आहे. सत्ता येती आणि जाते. मात्र नड्डा म्हणाले देशात एकच पक्ष राहणार आहे. त्यांनी ज्याला प्रदेशाध्यक्ष केलं त्यांची किती कुळं आहेत मला माहित नाही. पण शिवसेना संपुष्टात येऊ शकत नाही. मग त्यांची ५२ असो वा १५२ कुळे असो आपल्याला फरक पडत नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.