
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- राज्य शासनाचा पर्यटनाचा “ब” दर्जा प्राप्त असलेल्या पालघर जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जव्हार शहराच्या सभोवताली अनेक पर्यटन स्थळे आहेत.ऑगस्ट महिन्यात सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई,ठाणे,वसई-विरार,सेलवास व नाशिक आदी.ठिकाणाहून अनेक पर्यटकांचे पाय आपोआप जव्हारच्या दिशेने वळतात.आदिवासी बहुल भाग आणि डोंगर उताराचा भाग असल्याने श्रावणात निसर्ग आपले रूप फुलून दाखवतो.
हनुमान पॉईंट,सनसेट पॉईंट,छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळ,दाभोसा,हिरडपाडा,काळमांडवी असे प्रसिद्ध धबधबे,जयसागर व खडखड सारखी निसर्गरम्य धरणे,डोंगर उताराचे नागमोडी घाट,छोटे-मोठे असंख्य धबधबे श्रावण महिन्यात पर्यटकांसाठी मोठी पर्वणीच ठरते.सध्या पावसाची होणारी उघडझाप आणि सलगच्या सुट्ट्याने या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे.समुद्रसपाटीपासून अठराशे फूट उंचावर वसलेल्या जव्हार पर्यटन स्थळाला ब दर्जा प्राप्त झाल्या पासून पर्यटकांची ओढ जव्हारच्या दिशेने वाढत आहे.आज घडीला निसर्गाचे सौंदर्य आणि सुट्ट्यामुळे जव्हारची पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलून गेल्याचे चित्र दिसत आहे.
जव्हारच्या पर्यटन स्थळांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोईसुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची ओढ जव्हारच्या दिशेने अजून वाढेल.
पारस सहाणे
अध्यक्ष -जव्हार पर्यटन विकास संस्था जव्हार