दैनिक चालु वार्ता उपसंपादक पुणे जिल्हा -शाम पुणेकर.
पुणे : गणेशोत्सवासाठी घरोघरी बाप्पांच्या स्वागतासाठी भक्ताची तसेच सार्वजनिक मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर पोलीस व जिल्हा प्रशासनाकडूनही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान पुण्यातील नागरिकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात गणशोत्सव काळात ३१ ऑगस्ट आणि ९ सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. तसेच १० सप्टेंबर रोजी शहरातील विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
तसेच, गणेशोत्सव काळात अनुचित घटना टाळण्यासाठी शहरात कडक पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ७५०० पोलिसांची फौज ठेवली जाईल. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. या काळात शहर व उपनगरात पोलिसांचा खडा पहारा रहाणार आहे. पुण्यातील गणेशोत्सव पहाण्यासाठी राज्य, परराज्य तसेच परराष्ट्रातूनही भाविक येत असतात. शहराच्या मध्यभागी खूप गर्दी होते त्यामुळे संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी योग्य नियोजन करून कडक पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
