
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप
देगलूर प्रतिनिधी :
देगलूर तालुक्यातील मरखेल पोलीस ठाण्यात नेमणूक झाल्यापासून सतत आपल्या कार्यशैलीने वादग्रस्त ठरलेल्या येथील पोलीस कर्मचारी नारायण येंगाले हे अवैध धंद्यांना प्रोत्साहन देत असून, त्यांच्यामुळे या भागात अनेक अवैध व्यवसाय वाढीस लागले आहेत. येंगाले यांच्या कामकाजाची चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी दावणगीर येथील ग्रामपंचायत सदस्य जयपाल कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात मरखेल पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी नारायण येंगाले हे गेल्या दीड वर्षांपूर्वी मरखेल पोलीस ठाण्यात रुजू झाले असून, ते सतत त्यांच्या कार्यशैलीमुळे वादग्रस्त असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी रुजू असलेल्या ठाण्यातही त्यांची कारकीर्द ही वादग्रस्त आहे. येंगाले हे मरखेल पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या बेन्नाळ (ता. मुखेड) येथील रहिवासी असल्याने या भागात त्यांची चांगली ओळख आहे. याशिवाय त्यांच्याच गावातील याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या विष्णुकांत चामलवाड यांना मरखेल ठाणे हद्दीतील अवैध धंदेवल्या लोकांची चांगली माहिती असल्याने दोघांनी मिळून हणेगाव, मरखेल, माळेगाव (मक्ता) व मानूर या मोठ्या गावांसह परिसरातील संबंध गावात या लोकांच्या आर्थिक तोडपाणीमुळे मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे वाढीस लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते प्रसेनजीत दावणगीरकर यांच्यासह गावकऱ्यांनी या अवैध धंद्यांची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात करून कार्यवाहीची मागणी केली होती. याचा राग मनात धरून येंगाले यांनी दावणगीरकर यांना वारंवार धमक्या देऊन अपमानित केले आहे. शिवाय आपले नातेवाईक असलेल्या दावणगीर येथील अवैध व्यावसायिकामार्फत सांगून खतम करण्याची धमकी दिली आहे. येंगाले हे दावणगीर गावात वाद पेटवत आहेत. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पोलीस ठाण्यात रुजू झाल्यापासून हजारो नागरिकांना शिवीगाळ, अरेरावी करून अपमानित करणाऱ्या येंगाले यांच्यामुळे मटका, जुगार, अवैध देशी- विदेशी, गावठी दारू, अवैध पेट्रोल- डिझेल विक्री, व अन्य काळाबाजार असे धंदे सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी हे त्यांच्याकडून मिळत असलेल्या वरकमाईमुळे त्यांना सांभाळून घेत आहेत. त्यांच्या आजवरच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी व सेवेतून निलंबित करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. योग्य कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा जयपाल कांबळे यांनी निवेदनाच्या शेवटी दिला आहे.