
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा प्रवेश झाला.
पक्ष हायकमांडने अशोक गेहलोत यांचे पान कापून खर्गे यांना पुढे केले आणि दिग्विजय सिंह यांना बाजूला केले. खर्गे यांच्या अर्जात काँग्रेसचे 30 नेते प्रस्तावित होते. म्हणजेच उमेदवारीवरूनच विजयाची शक्यता दिसत आहे. सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर एक दिवस आधी खर्गे यांना बोलावण्यात आले होते. पक्षाचे बहुतांश नेते खर्गे यांच्या पाठीशी उभे आहेत. गांधी घराण्याचाही पूर्ण पाठिंबा दिसत असून, अशा स्थितीत त्यांचे अध्यक्ष होण्याचे निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पश्चात पत्नी राधाबाई, तीन मुली आणि दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा प्रियांक खर्गे हा कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूर येथून आमदार आहे. आमदार म्हणून त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्याचवेळी खर्गे यांचा दुसरा मुलगा कर्नाटकातील बंगळुरू येथील स्पर्श हॉस्पिटलचा मालक आहे.
खर्गे यांची गणना गांधी घराण्याच्या जवळच्या आणि विश्वासू नेत्यांमध्ये केली जाते. खर्गे मराठी चांगले बोलतात आणि त्यांना खेळांची देखील आवड आहे. विशेषतः क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल त्यांना आवडतात.
खर्गे यांचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वरवट्टी भागात एका शेतकरी कुटुंबात झाला. गुलबर्गा येथील नूतन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर तेथील सरकारी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. गुलबर्ग्याच्या सेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून एलएलबी केले.
खर्गे यांनी महाविद्यालयीन काळात विद्यार्थी राजकारणापासून राजकारणाला सुरुवात केली. कॉलेजमध्ये त्यांनी संघाच्या राजकारणात दीर्घ खेळी खेळली. 1969 मध्ये ते एमएसके मिल्स एम्प्लॉईज युनियनचे कायदेशीर सल्लागारही बनले. त्यानंतर ते संयुक्त मजदूर संघाचे प्रभावी नेते होते. कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी बरीच आंदोलने केली .
1969 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1972 मध्ये कर्नाटकातील गुरुमितकल विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. येथून ते 9 वेळा आमदार म्हणून निवडून आले. या काळात त्यांनी गुंडूराव, एस.एम. कृष्णा आणि वीरप्पा मोईली यांच्या सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम केले.
कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचे 2000 मध्ये चंदन तस्कर वीरप्पन याने खर्गे राज्याचे गृहमंत्री असताना अपहरण केले होते. नंतर त्याची सुटका करण्यात आली. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आणि गुलबर्गा येथून ते दोनदा लोकसभेचे खासदार होते. यादरम्यान त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कामगार आणि रोजगार मंत्री आणि रेल्वे मंत्री म्हणून काम केले. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आणि वरिष्ठ सभागृहात विरोधी पक्षनेते आहेत.