
दैनिक चालू वार्ता किनवट वार्ताहर- दशरथ आंबेकर
गेल्या सहा महिन्यापासून ईस्लापूर येथे १५ ते २० वानरांनी स्त्रिया, मुलांना चावा घेऊन धुमाकूळ घातल्याने येथील नागरिक या वन्यप्राण्यामुळे त्रस्त झाले होते.
या वन्यप्राण्यांना वैतागलेल्या नागरिकांनी येथील ग्राम पंचायतीने ठराव घेऊन वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे केली होती. त्यांना पकडण्यासाठी वन विभागाकडून गावात जागो जागी पिंजरे बसविले होते. पण ही वानर या पिंजऱ्यात जात नव्हते. दि. ३ आक्टोबर रोजी मात्र १३ वानरे या पिंजऱ्यात अडकल्याने वन विभागाला त्यांना जेरबंद करण्यात मोठे यश मिळाले आहे. या वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत
येणाऱ्या नंदगाव येथेही एका वानराने अशाच प्रकारे धुमाकूळ घालून अनेक नागरिकांना चावा घेऊन गंभीर जखमी केले होते. विहिरीवर पाणी भरणाऱ्या एका महिलेला विहीरीत ढकल्याने ती महिला विहीरीत पडली होती.
पण गावातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे ती महिला वाचली. त्यामुळे वानराने नंदगांवात चांगलीच दहशत निर्माण केली होती. सुदैवाने त्याही वानरास पकडण्यास वन विभागाला यश मिळाले आता ईस्लापूर मधील १३ वानराना बंदिस्त केले असून राहिलेल्या वानरांनाही लवकरच पकडण्यात यश मिळेल अशी आशा वनपाल विठ्ठलराव गुदे, वनरक्षक सय्यद यांनी व्यक्त केली.