
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर शहरातील विद्युत विभाग हा ऐन सणासुदीच्या काळामध्ये मध्यमवर्गीयांच्या मुळावर बसला आहे. वसुलीच्या नावाखाली देय दिनांक संपल्याबरोबरच ग्राहकांचे वीज खंडित करून मध्यमवर्गीयांना अंधारात बसविण्याचे कार्य येथील विद्युत विभाग करीत आहे. तर मोठे राजकारणी, व्यावसायिक, नेते मंडळींना बगल देत सामान्यांना सतावण्याचे उदिष्ठ जोपासत आहे . त्यामुळे सामान्य ग्राहक उधारी, उसनवारी करून वीज भरणा करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दरम्यान येथील वीज विभाग मात्र विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी जेवढा तत्परतेने वागतो आहे, ती तत्परता वीज पुरवठा सातत्याने करण्यासाठी वापरत नसल्याचे दिसून येते. थोडासा वारा सुटला किंवा पावसाचे चिन्ह दिसतात सर्वप्रथम वीज पुरवठा खंडित करण्यात येतो.
याचा सर्वात जास्त फटका येथील सामान्य गरीब कुटुंबाला बसतो रात्री बेरात्री त्यांना अंधारात चाचपडत बसावे लागते याउलट येथील मोठे व्यावसायिक आणि श्रीमंत लोकांना नागरिक याची पर्यायी व्यवस्था करून ठेवल्याने त्यांना याचा जास्त त्रास सहन करावा लागत नाही कारण वीज आली काय गेली काय हे त्यांना ठाऊकच नसतेपाठविण्यात येत नसल्याचे उदाहरण देगलूर शहरात पहावयास मिळते . त्यामुळे येथील सहाय्यक अभियंते व वीज कर्मचारी हे केवळ सामान्य जनतेलाच त्रास देण्यासाठी व नेतेमंडळी मोठे राजकारणी मोठे व्यावसायिक यांना खो देण्यासाठीच आहेत की काय असे सामान्य जनतेतून ऐकावयास मिळत आहे.
विद्युत निरिक्षकाची देगलूर शहराकडे पाठ
देगलूर शहराकडे मात्र विद्युत निरीक्षकांनी अनेकदा पाठ फिरवल्याचे दिसून येते कोणत्या इमारतीमध्ये किती वीजपुरवठा करण्यात यावा, कसा करण्यात यावा . त्यांची अर्थिंग, पुरवठा व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे व प्रमाणीत करून विजपुरवठा करण्याचे कार्य निरिक्षकांव्दारे असते परंतु येथील वरील कार्य हे येथील अकुशल कामगार, कर्मचारी व सहाय्यक अभियंते च पाहतात त्या मूळे च शहरात उच्च दाबाने कमी दाबाने विजपुरवठा होऊन अनेकदा शॉर्टसर्किट किंवा रोहित्र बंद पडणे अशा समस्या नेहमीच उद्भवत असतात अशामुळेच रोहीत्र बंद पडल्याने सामान्यांना तासंतास अंधारात चाचपडत राहावे लागते.
तक्रार नोंदविण्याचा क्रमांक नेहमीच व्यस्त …
विद्युत ग्राहकाची कोणतीही तक्रार असो सर्वप्रथम विज भरणा केलाय का ? हे पाहूनच तक्रारदाराची तक्रार नोंदविण्यात येते, म्हणजेच ग्राहकाच्या तक्रारीचा आणि विज बिलाचा काही एक संबंध नाही.
शिवाय तक्रार दाखल झाल्यास समाधान केव्हा करण्यात येईल या विचारणा करण्यासाठी जो नंबर दिला आहे तोनंबर नेहमीच व्यस्त असतो किंवा येथील कर्मचारी तक्रारदाराचा फोनच घेत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना नाकीनऊ येऊन वारंवार विद्युत विभागात चकरा माराव्या लागतात.
देगलूर विद्युत विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्याच्या अशा मनमानी व तुघलकी कामामुळे सामान्य जनता मात्र भरडली जात असून त्या विरोधात कोणास बोलावे. कोणाकडे तक्रार करावी याची सोय सामान्यांना राहिली नाही कारण वीज देयकाचे निमित्त समोर करून येथील कर्मचारी आणि अधिकारी हे ग्राहकांना वेठीस धरण्याचे काम करून सामान्यांच्या मुळाशी घाव घालण्याचे कार्य करीत असल्याचे दिसते.